पुणे, १० मार्च २०२५: सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते धायरीच्या दिशेने जाणाऱ्या सुमारे २१०० मिटर लांबीच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. यापुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, पथदिवे लावणे, हिंगणे चौकातील गर्डरवर डांबरीकरणाचे काम शिल्लक आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने २०२२ मध्ये उड्डाणपुलाचे काम सुरु केले होते. यासाठी ११८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राजाराम पूल चौकातील सुमारे ६५० मिटर लांबीचा उड्डाणपूल स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुला केला. त्यानंतर आता या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात लांब असलेला उड्डाणपूल उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे.
विठ्ठलवाडी येथील कमानीपासून सुरु होणारा हा उड्डाणपूल वडगाव येथे फनटाइम थिएटरच्या समोर उतरतो. या उड्डाणपुलाची लांबी २१०० मिटर इतकी आहे. यामुळे स्वारगेटकडून धायरी, नऱ्हे, खडकवासला आदी भागात जाणाऱ्या वाहनचालकांना इनामदार चौक, हिंगणे चौक, संतोष हॉल, मोरे चौक, शिवा काशीद चौक या पाच चौकांमध्ये सिग्नलला थांबण्याची गरज पडणार नाही. यामुळे या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल. वाहनचालकांचा वेळही वाचणार आहे.
या उड्डाणपुलाचे स्थापत्य विषयक काम पूर्ण झाले आहे. उड्डाणपुलावरील डांबरीकरणही पूर्ण झाले आहे. केवळ हिंगणे चौकातील तीन मीटरचे काम राहिले आहे. पुढील काही दिवसात पथदिवे लावणे, रस्त्यावर पट्टे मारणे, दिशादर्शक व माहिती दर्शक फलक लावणे अशी कामे केली जाणार आहे. ही काम मार्च महिन्याच्या अखेरीस पूर्ण होतील. तर माणिकबाग ते हिंगणे या धायरी ते स्वारगेट या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिवेशन संपल्यानंतर उद्घाटन
मुंबईत सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन मार्च महिन्याच्या अखेरीस संपणार आहे, त्यानंतरच पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या उड्डाणपुलाचे उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
More Stories
पुणे: वाघोलीत बर्निंग कारचा थरार; सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे वाहतूक पोलीस अकॅडमीत १००% अधिकारी-अंमलदारांना प्रशिक्षण; १८ सत्रांत मान्यताप्राप्त तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू -सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार