December 2, 2025

सोनिया गांधी आणि राहुल गांधीला सीबीआय आणि ईडीकडून अटक करण्याचा सरकारचा प्रयत्न; पुण्यात काँग्रेसचे तीव्र आंदोलन

पुणे, १६ एप्रिल २०२५: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करुन त्यांना सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून अटक करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला. याविरोधात आज पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

पुण्यातील पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ काँग्रेस पक्षाने जोरदार आंदोलन केले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, “भारतीय जनता पक्ष, मोदी आणि शाह यांच्या गटाने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर मनीलाँड्रिंगचा खोटा आरोप केला आहे. त्याचप्रमाणे अनबेलेबल सेक्शन लावून त्यांना अटक करण्याचा घाट घालण्यात येत आहे. हे सर्व आगामी बिहार निवडणुकीसाठी केले जात आहे. आमच्या नेत्यांवर एक हातही लावला तर देश उठून उचलणार आहे. सरकारकडून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत.”

आता पर्यंत ईडीने ९०० केसेस दाखल केल्या असून, फक्त दोन केसेसचे निकाल आले आहेत. शिंदे यांनी आरोप केला की, बाकी सर्व केसेस ही फक्त नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी दाखल करण्यात आल्या आहेत.