October 24, 2025

१०० मिळकती जप्त होऊनही अजून लिलाव होईना

पुणे, १६ एप्रिल २०२५ ः मागील वर्षी जप्तीची कारवाई केलेल्या मिळकतींची महापालिका प्रशासनाकडून लवकरच लिलाव प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामध्ये जप्त केलेल्या मिळकतींमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागातील सुमारे शंभर मिळकतींचा समावेश आहे.

महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून मिळकत कर थकबाकी असणाऱ्या मिळकतकरधारकांना दिलेल्या मुदतीत मिळकत कर भरण्यासाठी सांगण्यात येते. मिळकतकरधारकांना त्याबाबत वेळोवेळी नोटीस पाठवुन कराची थकबाकी भरण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र वारंवार नोटीस बजावूनही मिळकतकर भरण्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून संबंधित मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात येते. मागील वर्षी मिळकत कर विभागाने शहरातील ९० ते १०० मिळकतींवर जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर या मिळकतींचे मूल्यांकनाची प्रक्रियाही पार पडली आहे, त्यानंतर संबंधित मिळकतींचा लिलाव करण्याची प्रक्रिया पुढे सरकलेली नव्हती.

दरम्यान, आता महापालिकेकडून संबंधित मिळकतींची लवकरच लिलाव प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. सध्या मिळकतींवर बोजा चढविण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर आठ दिवस आगोदर लिलावाची तारीख जाहीर करून लिलाव प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. याबाबत मिळकत कर विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील म्हणाल्या, “मागील वर्षी जप्त केलेल्या मिळकतींचे मूल्यांकन झालेले आहे, लवकरच लिलाव प्रक्रिया पूर्ण केली जाईल.’