लोहगाव, ४ नोव्हेंबर २०२५ : लोहगावातील एका झोपडीतून सुरु झालेला प्रवास थेट बहरैनपर्यंत पोहोचला आहे! नंदीबैल घेऊन दारोदारी फिरणाऱ्या वडिलांचा मुलगा सनी सुभाष फुलमाळी या १७ वर्षीय कुस्तीपटूने एशियन युथ कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकत संपूर्ण परिसराला अभिमानाची जाणीव करून दिली आहे. आर्थिक अडचणी, मर्यादित साधनं आणि कष्टमय जीवन या सर्व अडथळ्यांवर मात करत सनीने झोपडीतील मातीचा सुगंध आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दरवळवला आहे.
सनीचे वडील सुभाष फुलमाळी हे लोहगाव परिसरात नंदीबैल घेऊन भविष्य सांगण्याचे पारंपरिक काम करतात, तर आई आणि बहीण सुई-दोरा विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा साध्या परिस्थितीत वाढलेला सनी आज आशियाई पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल करत आहे. सनीचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील आष्टी असून, हे कुटुंब मागील पंधरा वर्षांपासून लोहगावात वास्तव्यास आहे.
लहानपणापासूनच कुस्तीची आवड असलेल्या सनीची प्रतिभा रायबा तालमीमध्ये सोमनाथ मोझे आणि सदा राखपसरे यांनी ओळखली. पुढे त्याला अधिक चांगले प्रशिक्षण मिळावे म्हणून त्याला लोणीकंद येथील जाणता राजा तालीममध्ये पाठविण्यात आले. येथे वस्ताद संदीप भोंडवे यांनी सनीच्या परिस्थितीची जाणीव ठेवून त्याचा सर्व प्रशिक्षण व निवासाचा खर्च उचलला.
बहरैन येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन युथ कुस्ती स्पर्धेत ६० किलो वजनी गटात सनीने इराक, इराण, जपान आणि कोरिया आदी देशांच्या खेळाडूंना पराभूत करून सुवर्ण पदक पटकावले. या यशानंतर सनी म्हणाला, “घरची परिस्थिती कठीण होती, पण वस्ताद संदीप भोंडवे यांनी मला दत्तक घेऊन सर्व खर्च उचलला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज मी गोल्ड मेडल जिंकू शकलो. आता माझं स्वप्न आहे – ऑलिंपिकमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक मिळविण्याचं.”
वडील सुभाष फुलमाळी म्हणाले, “आम्हाला नेहमी वाटायचं की सनी किंवा त्याचा भाऊ आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावा. आज सनीने तो अभिमानाचा क्षण दिला आहे. आमच्या झोपडीतील आनंद शब्दात मावत नाही.”
रायबा तालमीचे मोझे यांनी सांगितले, “सनी अतिशय कष्टाळू आणि बुद्धिमान खेळाडू आहे. परिस्थिती आडवी येत होती, म्हणून त्याला भोंडवे यांच्या तालीमीत दिलं. आज त्याने दाखवून दिलं की मेहनत आणि मार्गदर्शन असलं तर झोपडीतील मुलगाही जग जिंकू शकतो.”
सनीचा गौरव – आमदार पठारे यांच्याकडून ११ हजारांचे बक्षीस
आमदार बापूसाहेब पठारे, युवा नेते सुरेंद्र पठारे, रविंद्र पठारे, प्रितम खांदवे, निलेश पवार आणि सोमनाथ मोझे यांच्या हस्ते सनीचा सत्कार करण्यात आला. यावेळी पठारे यांनी सनीला ११ हजार रुपयांचा धनादेश देत पुढील काळात आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

More Stories
Pune: पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: कामात हलगर्जीपणा केल्याने शाखा अभियंता आकाश ढेंगे निलंबित
Pune: कोथरूड बस डेपो चौकात उभारणार दुमजली उड्डाणपूल; वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचे पाऊल