पुणे, ४ जुलै २०२५ : मृत्यूपर्यंत एकही लढाई न हरलेल्या अजेय सेनानी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा साडेतेरा फूट उंच भव्य अश्वारूढ पुतळा आज खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरात उभारण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी अमित शहा म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे बीज पेरले. त्याची मशाल पुढे ठेवत बाजीराव पेशवे यांनी युद्धकौशल्याच्या माध्यमातून देशाच्या सीमांचे संरक्षण आणि विस्तार साधले. त्यांच्या युद्धनितीचा अभ्यास केला, तर देशाच्या सीमा भविष्यातही सुरक्षित राहतील.”
बाजीराव पेशव्यांचे शौर्य, समर्पण, त्याग आणि रणनिती आजच्या पिढीला प्रेरणा देईल, असेही शहा यांनी सांगितले.
एनडीएमधील विद्यार्थ्यांना या पुतळ्यामुळे सातत्याने प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बाजीराव पेशवे यांच्या लढवय्या व्यक्तिमत्त्वाचे आणि अजेय पराक्रमाचे वर्णन करताना अमित शहा म्हणाले, “ बाजीरावांनी पराक्रमाचा इतिहास घडवला, त्यांच्या प्रेरणादायी जीवनामुळे माझ्यासारख्या व्यक्तीलाही कधी निराशा आली, तर उमेद मिळते.”
कार्यक्रमात पुतळ्याच्या उभारणीत योगदान दिलेल्या शिल्पकार विपुल खटावकर, वास्तुविशारद अभिषेक भोईर आणि सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे यांचा विशेष सत्कार अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, एनडीएचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंह, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण मंचावर होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले, “मराठी माणसाच्या रक्तात शिवरायांनी स्वराज्याची ज्योत चेतवली, ती बाजीराव पेशव्यांनी अखंड ठेवली. आज एनडीएमध्ये हा पुतळा उभा राहत असल्याने मराठ्यांचा शौर्यपूर्ण इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचेल.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन शेटे यांनी केले, तर आभार कुंदनकुमार साठे यांनी मानले.
More Stories
पुणे मेट्रोच्या ताफ्यात लवकरच नवीन १२ मेट्रो ट्रेन सेट
पुणे: जवानाच्या वेळीच धाव घेतल्याने टळली दुर्घटना; खिडकीत अडकलेल्या चार वर्षाच्या मुलीचे वाचवले प्राण
Pune: डिजे लावणार्या गणेश मंडळांना मदत नाही, डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार