पुणे, दि. २८ जानेवारी २०२४ : अनेकविध प्रांतांची संस्कृती, विविध समुदायांचे तत्वज्ञान आणि अनेकतेत एकोप्याचा संदेश देणारी भव्य शोभायात्रा आज पुणेकरांनी अनुभविली. विविधतेतील एकता जपण्याचे सूत्र स्वीकारून कार्यरत असलेल्या ‘भारत भारती’ या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आणि भारतीय प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव असे दुहेरी औचित्य साधून या विशेष उपक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते.
भारत भारती संस्थेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष विनय पत्राळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ उद्योगपती आणि संस्थेच्या महाराष्ट्र राज्य विभागाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पुणे शहर अध्यक्ष अचल जैन, उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, खजिनदार ओमप्रकाश चौधरी, महाराष्ट्र विभाग सचिव धर्मेंद्र सिंग राजवाड, उपक्रमाचे सह संयोजक व प्रांत संयोजक समीर पंड्या आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या अंतर्गत आज सायंकाळच्या सुमारास टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय मैदान येथून ही अतिभव्य स्वरूपातील राष्ट्रीय एकात्मता शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये किमान १० हजार पदयात्री सहभागी झाले होते. विविध प्रांत, समुदाय यांचे तब्बल ६० भव्य असे रथ हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले. शोभायात्रेत सहभागी झालेल्या शैक्षणिक संस्थांच्या रथांवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचे दर्शन घडविले गेले. तर समुदायांनी सादर केलेल्या रथांवर तत्त्वज्ञानाला अनुसरून संदेश देण्यात आला होता. भारत भारतीच्या भारतमातेच्या विशेष रथाने उपस्थितांचे लक्ष वेधले.
स. प. महाविद्यालय – अभिनव चौक – शनिपार चौक – तुळशीबाग – मंडई – बेलबाग चौक – लक्ष्मी रस्ता – अलका टॉकिज मार्गे पुन्हा स. प. महाविद्यालय असा या शोभायात्रेचा मार्ग होता व दोन लाख दर्शकांच्या साक्षीने ही भव्य शोभायात्रा संपन्न झाली अशी माहिती भारत भारती संस्थेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष विनय पत्राळे यांनी दिली.
भारत भारती संस्था देशाच्या एकात्मतेला सर्वोच्च प्राधान्य देत कार्यरत आहे. आपल्या देशातील प्रत्येक राज्याची भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थ, पोषाख, सण – उत्सव यांत वैविध्य आहे. ही विविधता बहुविध सौंदर्यासोबतच देशाला विविधतेतील एकतेचा संदेश देणारी आहे. देशातील अनेक नागरीक कामाच्या, शिक्षणाच्या निमित्ताने सातत्याने देशाच्या विविध राज्यांत प्रवास आणि निवास करतात. जिथे जातील तिथे आपल्या राज्यातील वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करतात. त्यातून प्रत्येक मोठ्या शहरात आपल्या देशाचे एक लघुरूप साकार होते. या साऱ्या देशबांधवांना एका व्यासपीठावर आणण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचेही ते पत्राळे म्हणाले.
या शोभायात्रेत देशातील केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, ईशान्य भारत, ओडिसा, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली- हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, झारखंड, मध्यप्रदेश, मणिपूर यांसह महाराष्ट्रातील नागरिक सहभागी झाले होते.
शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या संस्थांमध्ये शिक्षण प्रसारक मंडळी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महर्षी स्त्री शिक्षण संस्था, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, लोकसेवा सैनिक स्कूल, ऑफिसर्स करिअर अकादमी, पुलगाव मिलिट्री स्कूल, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, एमआयटी, सिम्बायोसिस, भारती विद्यापीठ, डी वाय पाटील विद्यापीठ, झील इन्स्टिट्यूटस, खडकी शिक्षण संस्था यांचा समावेश आहे.
याबरोबरच जैन समाज, शीख समाज, नेपाळी समाज, सिंधी समाज, बौद्ध समाज, तिब्बती समाज, जनजाती समाज, आर्य समाज, गायत्री परिवार, प्रजापिता ब्रह्मकुमारी, आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली योगपीठ, आई माता मंदिर, सालासर बालाजी मंदिर, खाटू शाम मंदिर, दगडूशेठ हलवाई गणपती, इस्कॉन, रामकृष्ण मिशन, श्रीमद् रामचंद्र मिशन, अग्रवाल समाज, स्वामी नारायण आणि गीता धर्म मंडळ आदी समुदायाचे नागरिक देखील यामध्ये सहभागी झालेले पहायला मिळाले.
More Stories
तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी Rs ५९.७५ कोटी निधीस मान्यता
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय