पुणे, २ मार्च २०२६ : प्रवाशांची सुरक्षितता आणि शिस्तीच्या दृष्टीने पुणे मेट्रोने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता मेट्रो स्थानकांवरील ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (AFC) गेट्स तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार आहेत. हा बदल मंगळवार, ३ मार्च २०२६ पासून लागू होणार आहे.
आतापर्यंत स्थानकांवरील AFC गेट्स उघडे असायचे. प्रवाशांनी तिकीट स्कॅन केल्यावर हिरवा दिवा लागत असे आणि प्रवाशांना त्यातून प्रवेश करता येत असे. चुकीचे किंवा तिकीट नसल्यास गेट बंद होत असे. मात्र नव्या पद्धतीनुसार आता गेट्स नेहमी बंद राहतील.
प्रवाशांनी क्यूआर कोड तिकीट, मेट्रो कार्ड किंवा व्हॉट्सॲप तिकीट मशीनवर स्कॅन केल्यानंतरच गेट उघडेल. प्रवासी आत गेल्यानंतर गेट पुन्हा आपोआप बंद होईल.
विना तिकीट प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास गेट उघडणार नाही. या बदलामुळे तिकीट तपासणी अधिक कडक होणार असून विनातिकीट प्रवासावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, असा विश्वास मेट्रो प्रशासनाने व्यक्त केला आहे.

More Stories
दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील १२८ नागरिक सुखरूप परत
पुणे : रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३५० जणांचे रक्तदान; नववे वार्षिक शिबिर उत्साहात संपन्न
विमाननगरातील रामेश्वरम हॉटेलवर महापालिकेचा हातोडा; ६,५०० चौ. फूट बेकायदा बांधकाम जमीनदोस्त