पुणे, ४ सप्टेंबर २०२४: लोकसभा निवडणुकीत आमदार सुनील टिंगरे यांनी भाजपचे काम केले नसल्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्हीही त्यांचे काम करणार नाही, अशी भूमिका वडगाव शेरीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांसमोर मांडली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी महायुतीतील संघर्ष अधिक टोकदार होण्याची चिन्हे आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी वडगाव शेरी येथील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीवळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, जगदीश मुळीक, स्थानिक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांविरोधात आपली खदखद व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वीच वडगाव शेरीतील विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी श्रेयवाद उफाळून आला होता. आमदार सुनील टिंगरे युतीधर्म पाळत नसल्याचा थेट आरोप येथील माजी आमदार जगदीश मुळीक यांनी त्यावेळी केला होता. त्याच्या दोन पावले पुढे जाऊन भाजप पदाधिकाऱ्यांनी आज टिंगरे यांच्यावर आरोप केले आणि तसे लेखी पत्र पंकजा मुंडे यांना दिले. तसेच वडगाव शेरी मतदारसंघ भाजपला द्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी मुंडे यांच्याकडे केली.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलाचे फेक नेरिटीव्ह पसरवून काही प्रमाणात यश मिळवले. आता मात्र जनता खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही, असा विश्वास कार्यकर्त्यांना देत लाडकी बहीण, तसेच युती सरकारच्या इतर योजना जनतेपर्यंत जाऊन पोहोचवा असा सल्ला मुंडे यांनी बैठकीतील पदाधिकाऱ्यांना दिला.
त्यानंतर बोलताना मुंडे म्हणाल्या, आयुष्यभर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधक मानले त्यांना सोबत घ्यावे लागले. सत्तेसाठी असे तह करावे लागतात. वडगाव शेरीत भाजपची मोठी ताकद असल्यामुळे हा मतदारसंघ भाजपला देण्याची पदाधिकाऱ्यानी केलेली मागणी नैसर्गिक आहे. परंतु कोणती जागा कोणाला सोडायची याचा निर्णय वरिष्ठ घेतील.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन