October 21, 2025

आसावरी जगदाळे यांना शासकीय नोकरी जाहीर, जगदाळे कुटुंबीयांनी सरकारचे मानले आभार

पुणे, २९ एप्रिल २०२५: जम्मू का्मिर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळेला राज्य शासनाच्या वतीने शासकीय नोकरी जाहीर करण्यात आली आहे. तसेच आर्थिक मदत देखील देण्यात येणार असल्याने जगदाळे कुटुंबीयाने आता राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. त्यात राज्यातील ५ पर्यटकांचा समावेश असून त्यामध्ये कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या दोन पर्यटकांचा देखील समावेश होता. दरम्यान आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत राज्य सरकारच्या वतीने पहलगाम हल्ल्यातील मृत कुटुंबीयांना शासकीय मदत व संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय नोकरी जाहीर करण्यात आली आहे. यावर जगदाळे कुटुंबीयांनी सरकारचे आभार मानले असून सरकारने आमची दखल घेत माझ्या आणि माझ्या मुलीसाठी शासकीय मदत जाहीर केली त्याबाबत सरकारचे खरंच आभार असल्याचे यावेळी संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी सांगितले आहे.

याबाबत प्रगती जगदाळे म्हणाल्या, “या प्रकरणात सरकारने आमची दखल घेतली त्यासाठी सरकारचे आभार मानते. खरंच आम्हाला शासकीय मदतीची गरज होती आणि सरकारकडून ती जाहीर देखील झाली. त्याबद्दल मी सरकारचे आभार मानते. सरकारला माझी अशी विनंती आहे की तिला अश्या ठिकाणी नोकरी द्यावी जिथे ती लोकांना मदत करेल.”

शासकीय नोकरीच्या संदर्भात आसावरी म्हणाली, “मी मुख्यमंत्री तसेच शासनाचे आभार मानते त्यांच्या निर्णयामुळे मला संधी मिळाली आहे.मुख्यमंत्री यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की ते आमच्या कुटुंबाच्या सोबत आहेत. माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी खूप मोठी व्हावी आणि एक मुलगा म्हणून मी कायम साथ द्यावी त्यांनी नेहेमी मला पाठींबा दिला आहे.”