May 16, 2024

पुणे मेट्रोच्या कामासाठी बाणेर रस्ता बंद; ‘पीएमपीएल’तर्फे बस मार्ग मध्ये बदल

पुणे, १० ऑगस्ट २०२३: शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम करण्यासाठी बाणेर रस्ता सोमेश्वर वाडी फाटा ते महाबळेश्वर हॉटेल यादरम्यान १२ ते १५ ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवला जाणार आहे. त्याचा परिणाम या भागातील वाहतुकीवर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पीएमपीएल तर्फे या मार्गावरील बसच्या मार्गात बदल करत पर्यायी मार्ग सुचविलेले आहेत. नागरिकांनी हा बदल स्वीकारून त्यानुसार बसने प्रवास करावा असे आवाहन पीएमपीएल तर्फे करण्यात आलेली आहे.

मेट्रो प्रकल्पाचे शिवाजीनगर ते हिंजवडी माण फेज ३ या मार्गावरील काम सुरू असल्यामुळे सोमेश्वर वाडी फाटा ते महाबळेश्वर हॉटेल बाणेर पर्यंत मेट्रोच्या कामाकरीता दिनांक १२ ते १५ ऑगस्ट २०२३ या चार दिवसांच्या कालावधीमध्ये बाणेर रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी बाणेर रस्त्यावरून संचलनात असलेले बस मार्ग क्रमांक ११४, २०८, २५६, २५८ व ३६० या बस मार्गांच्या वाहतुकीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करणेत आला आहे.

बस मार्ग क्रमांक ११४, २०८, २५६, २५८ व ३६० या बस मार्गांवरील बसेस बाणेरकडे जाताना बाणेरफाटा चौकातून उजवीकडे वळून सर्जा हॉटेल, औंध आयटीआय, परिहार चौकातून पुढे डावीकडे वळण घेऊन डीपी रोडने आंबेडकर चौक येथून उजवीकडे वळण घेऊन मिडी पॉईंट हॉस्पिटल पासून डावीकडे वळण घेऊन लिंकरोडने सरळ पुढे ताम्हाणे चौकातून डावीकडे वळण घेऊन कपिल मल्हार चौकातून बाणेर बस थांब्यापासून पुढे पूर्ववत बस मार्गाने बसेसचे संचलन सुरू राहील.

तसेच दिनांक १६ ऑगस्ट २०२३ पासून सर्व बस मार्ग पूर्ववत संचलनात राहतील, याची सदर मार्गांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नोंद घ्यावी.