October 5, 2024

काश्मीरच्या लाल चौकात बाप्पा विराजमान

पुणे, ता. ६/०९/२०२४: सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. पुण्याचा बाप्पा जम्मू-काश्मीरला पोहोचला असून, काश्मीरच्या श्रीनगरमधील लाल चौकातील पंच हनुमान मंदिरात सर्वधर्म समभाव गणपती बाप्पाच्या मूर्तीची कायमस्वरूपी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सीमेवर संरक्षण करणारे जवान, काश्मीरमधील मराठी बांधवांच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारी पार पडला.

पुण्यातील वंदे मातरम् संघटना, सरहद संस्था व युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट यांच्या सहकार्याने गणपती बाप्पांची ही मूर्ती कायमस्वरूपी येथे बसविण्यात आली आहे. ‘हम सब एक है’, ‘जात-धर्म, पंथ फक्त भारतीय’, असा नारा देत येणाऱ्या पिढ्यांसाठी ही गणपती बाप्पाची मूर्ती एकतेचे प्रतीक म्हणून देशभरात ओळखली जाईल, असा विश्वास वंदे मातरम् संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे यांनी व्यक्त केला. प्रसंगी आयटी सेल प्रमुख विशाल शिंदे, सीमेवरील जवान धनाजी हासबे, अनुप सावंत, चंद्रकांत जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व मराठी बांधव उपस्थित होते.