February 12, 2025

वीजबंद मागे; शिवाजीनगर, डेक्कन भागात शनिवारी वीजपुरवठा नेहमीप्रमाणे सुरु राहणार

पुणे, दि. ३१ जानेवारी २०२५: शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रो व महापारेषणच्या अतिउच्चदाब वीजवाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी महापारेषणच्या तीन अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार होता. मात्र हे पूर्वनियोजित काम पुढे ढकलण्यात आले असून शनिवारी (दि. १ फेब्रुवारी) शिवाजीनगर, गणेशखिंड व डेक्कन परिसरातील वीजपुरवठा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. या मार्गावरील महापारेषणच्या १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी २२०/१३२ केव्ही गणेशखिंड व चिंचवड उपकेंद्र आणि कोथरूडमधील जीकेआरएस अतिउच्चदाब उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार होता. त्यामुळे शनिवारी (दि. १ फेब्रुवारी) सकाळी ८ ते सायंकाळपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार असल्याचे शिवाजीनगर, डेक्कन, गणेशखिंड भागातील नागरिकांना कळविण्यात आले होते. मात्र हे काम स्थगित करण्यात आले असून शनिवारी (दि. १ फेब्रुवारी) २२०/१३२ केव्ही गणेशखिंड व चिंचवड उपकेंद्र आणि कोथरूडमधील जीकेआरएस उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरु राहणार आहे. त्यामुळे महावितरणच्या सर्व उपकेंद्रांसह शिवाजीनगर, गणेशखिंड, डेक्कन आदी भागातील वीजपुरवठा नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे.