September 20, 2025

“भारत गौरव – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन” : आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी विशेष पर्यटन यात्रा ९ जूनपासून सुरु

मुंबई, १६ मे २०२५: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने एक अनोखी आणि अभिमानास्पद पर्यटन यात्रा जाहीर केली आहे. “भारत गौरव – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ही विशेष पर्यटक ट्रेन ९ जून २०२५ पासून आपल्या प्रवासाला सुरुवात करणार असून, ही पाच दिवसांची ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक सफर महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा साक्षात अनुभव देणार आहे.

या भारत गौरव टूरिस्ट ट्रेन अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. यात रायगड, पुण्यातील लाल महाल व शिवसृष्टी, शिवनेरी, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, प्रतापगड, कोल्हापूर व पन्हाळा अशा ठिकाणांचा समावेश आहे. ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुरु होईल आणि दादर, ठाणे येथूनही प्रवासी सहभागी होऊ शकतील.

या उपक्रमामागे महाराष्ट्र शासनाचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगौरवाशी निगडीत स्थळांना अधिक प्रसिद्धी देणे, नव्या पिढीला इतिहासाची साक्ष घडवणे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीला उजाळा देणे हा आहे. पर्यटनमंत्री श्री. शंभुराज देसाई आणि राज्यमंत्री श्री. इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली, पर्यटन प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, व्यवस्थापकीय संचालक श्री. मनोजकुमार सूर्यवंशी आणि पर्यटन संचालक श्री. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी होत आहे.

ही यात्रा म्हणजे केवळ पर्यटन नव्हे, तर एक भावनिक आणि शौर्यपूर्ण अनुभव आहे. प्रत्येक गड, किल्ला, मंदिर, आणि संग्रहालय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय सांगणार आहे. स्थानिक शिवप्रेमी संघटनांच्या सहकार्याने, इतिहासावर आधारित कार्यक्रम, मार्गदर्शक गाईड्स आणि धार्मिक-सांस्कृतिक अनुभवांचे आयोजन करण्यात येणार आहे.

भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यातील समन्वयामुळे यात्रेतील प्रत्येक प्रवासीसाठी सुविधा, भोजन, प्रवास विमा, प्रवेश शुल्क, राहण्याची व्यवस्था इत्यादींची सोय करण्यात आली आहे. यात इकोनॉमी (SL), कम्फर्ट (3AC) व सुपीरियर (2AC) अशा विविध श्रेणींतील पॅकेजेसचा समावेश आहे.
यात्रेचा मार्ग: मुंबई (CSMT) – रायगड – पुणे – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर – पन्हाळा – मुंबई
प्रमुख ठिकाणांची वैशिष्ट्ये:
रायगड किल्ला – राज्याभिषेक स्थळ
लाल महाल, पुणे – बालशिवरायांचे वास्तव्य
शिवनेरी किल्ला – जन्मस्थळ
भीमाशंकर – ज्योतिर्लिंग
प्रतापगड – अफझल खान विजय
कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर
पन्हाळा किल्ला – बाजीप्रभूंचे शौर्य
पॅकेजमध्ये समाविष्ट सेवा:
SL/3AC/2AC प्रवास
AC/Non-AC हॉटेलमध्ये निवास
शुद्ध शाकाहारी भोजन
स्थानिक वाहतूक, गाईड, प्रवेश शुल्क
प्रवास विमा, सुरक्षा व्यवस्था
संपर्क व आरक्षणासाठी: IRCTC संकेतस्थळ: www.irctctourism.com

या ऐतिहासिक यात्रेबाबत अधिक माहिती देताना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी सांगितले, “ही केवळ सहल नसून आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि अभिमानाचा जागर आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी वारसा देशभर पोहोचेल.”

“छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ट्रेनचा प्रत्येक टप्पा – एक प्रेरणादायी अध्याय… आणि प्रत्येक क्षण – ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा गर्जना करणारा ठरेल!