September 20, 2025

ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा भाजपकडून पुण्यात विजय उत्सव

पुणे, ७ मे २०२५: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर बुधवारी हल्ला करत अनेक दहशतवाद्यांना मारले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार हेमंत रासने यांच्याकडून पुण्यात विजयी उत्सव साजरा करण्यात आला आहे.

या यशस्वी कारवाईचा विजय उत्सव आणि भारतीय सैन्याचे हात बळकट करण्यासाठी रासने यांच्यावतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची महाआरती करत साकडे घालण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच “भारत माता की जय, वंदे मातरम्” म्हणत जल्लोष करण्यात आला.

यावेळी रासने म्हणाले की, “पहलगाम येथे दहशतवादी हल्यात २७ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंती अमित शाह यांनी या घटनेचा सडेतोड उत्तर देऊ असे आश्वासन दिले होते. आज मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हल्ला केला. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगात शांतता निर्माण करत आहे. पण जर देशाच्या सुरक्षेला आघात केला तर त्यास उत्तर ही देण्यास भारत समर्थ आहे, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. जे २७ लोक पहलगाम येथे मृत पावले होते त्यांचा आज बदला घेत त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली दिली आहे.”