June 22, 2025

इस्लाम धर्माच्या संदर्भातील आक्षेपार्ह पोस्टमुळे विद्यार्थिनीविरोधात गुन्हा दाखल; विमानतळ पोलिसांकडून कारवाई

पुणे, २१ मे २०२५: सिम्बायोसिस कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीविरुद्ध सोशल मीडियावर इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारा व्हिडिओ पोस्ट केल्याच्या आरोपावरून विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित विद्यार्थिनीची ओळख ‘शर्मिष्ठा’ या नावाने झाली असून, तिचे पूर्ण नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिचा ट्विटर (एक्स) हँडल @Sharmishta_19 असून, तिने दिनांक १४ मे २०२५ रोजी वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रविण चंद्रकांत गुरव (ब. क्र. 2134) यांनी अधिकृत फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्यानुसार, दिनांक १५ मे रोजी ते आपल्या कर्तव्यात असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्यांना सदर व्हिडिओबाबत माहिती दिली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले की व्हिडिओमध्ये केलेली विधाने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी असून, त्याचा समाजामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

मात्र हा व्हिडिओ काही वेळाने डिलीट करण्यात आला असला, तरी ‘टीम रायझिंग फॅल्कन’ (@TheRFTeam) या ट्विटर युजरने त्याची दखल घेत ती क्लिप पुन्हा ट्विट केली आणि संबंधित विद्यार्थिनीविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, मुस्लिम समुदायाकडून याबाबत तक्रार करण्यात येत आहे. पोलिसांनी सदर व्हिडिओचे तांत्रिक आणि मजकूरात्मक विश्लेषण केल्यानंतर, त्यातील विधाने हेतुपुरस्सर द्वेष निर्माण करणारी, धार्मिक तेढ वाढवणारी आणि सामाजिक सलोखा बिघडवणारी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्याआधारे पोलिसांनी शर्मिष्ठा या विद्यार्थिनीविरोधात भारतीय दंड संहिता कलम २९९ (धार्मिक भावना दुखावणे), १९६ (१)(अ) (धर्माच्या आधारे द्वेषभावना पसरविणे) आणि कलम ३५३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.