November 5, 2025

पहलगाम हल्ल्यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी जातीनिहाय जनगणनेची घोषणा – खासदार संजय राऊत

पुणे, ३ मे २०२५: जातीनिहाय जनगणनेची घोषणा करत सरकारने हेडलाईन दिली. पण याची डेडलाईन दिलेली नाही. जातीनिहाय जनगणनेला आमचा पाठिंबा आहे. त्याला विरोध करण्याचे कारण नाही. मात्र ही जनगणना कधी सुरू करणार आहेत. पहलगाम हल्ल्याच्या गंभीर विषयापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच सरकारने जातीनिहाय जनगणनेची घोषणा केल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

खासदार संजय राऊत शनिवारी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्य संघटक वसंत मोरे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यावेळी उपस्थित होते.
राऊत म्हणाले, गेल्या १० वर्षात कश्मीरमध्ये झालेल्या प्रत्येक हत्याकाडांला, दहशतवादी हल्ल्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच जबाबदार आहेत. तरीही अशा व्यक्तीला पंतप्रधान मोदी यांनी पदावर का ठेवले, हे मोठे रहस्य आहे. पहलगाममध्ये २७ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे अमित शहा यांचा राजीनामा घेण्याची गरज आहे. गेल्या १० वर्षात जम्मू कश्मीरमध्ये जेवढे सैनिक, पोलीस, सर्वसामान्य नागरिक मारले, त्या सर्वांना अमिश शहा जबाबदार आहेत. तरीही ते पदावर असून सत्ता भोगत आहेत. ही आपल्या देशाची अवस्था आहे. या गंभीर मुद्दयावर संसदेचे विशेष अधिवेशन घेत यावर चर्चा झाली पाहिजे. मात्र, संसदेच्या अधिवेशनात जम्मू कश्मीरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांना बोलू दिले जाणार नाही, वेगळाच विषय समोर आणून गोंधळ घालत कामकाज तहकूब करण्यात येईल. त्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारच्या चुकांचे समर्थन करणे देशाला परवडणारे नाही, असेही त्यांनी सांगितले.

कश्मीरमध्ये एवढे मोठे हत्याकांड झाले असताना आपल्या देशाचे पंतप्रधान विविध कार्यक्रमांना हजेरी लावत हास्यविनोद करत आहे. पंतप्रधान बिहारमध्ये प्रचाराला गेले. पाकिस्तानला धडा शिकवू अशी घोषणा केली. त्यानंतर मुंबईत येऊन नऊ तास नटनट्यांसोबत मजेत वेळ घालवला. त्यांना दुखवटा, राष्ट्रीय शोक आहे की नाही?, सामान्य माणसाच्या जिवाला काही किंमत आहे की नाही? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

पंतप्रधान किंवा सरकारचे वर्तन पाहता ते युद्धाला सामोरे जात आहेत, असे वाटत नाही. फक्त माध्यमांमध्ये बातम्या येत आहेत. फक्त राष्ट्रीय माध्यमांनी युद्ध सुरू केले आहे. पाकिस्तानवर बॉम्ब टाकला आहे. तेथील राज्यकर्ते पळून गेल्याचे चित्र रंगवण्यात येत आहे. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यांची आता काय मानसिकता आहे ते पहावे लागेल, अशी टीकाही राऊत यांनी केली.

भाजमध्ये विलीन झाले तरच ते मुख्यमंत्री होतील
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाबाबत आशा व्यक्त केली आहे. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री होणार नाहीत. एकनाथ शिंदेही पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा गट भाजपमध्ये विलीन झाला तर ते कदाचित भाजपचे मुख्यमंत्री होतील, हे त्यांना अमित शहा यांनी देखील सांगितले आहे. भाजप आणि हे दोन्ही गट अमित शहाच चालवतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.