पुणे, १४ एप्रिल २०२५: शहरासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उन्हाचा ताप जाणवत आहे. तसेच कमाल तापमानात ही चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याच वाढत्या उन्हाच्या तापामुळे सध्या विविध आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या शहरात सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून याबाबत काळजी घेण्याच आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
शहरातील तापमानाची स्थिती पाहता, याबाबत ससून रुग्णालयाचे डॉ. संजय गायकवाड म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून शहराच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी उन्हाचा चटका अधिक जाणवू लागला आहे. यामुळे व्हायरल आजारांचे रुग्ण सुद्धा वाढलेले पाहायला मिळत आहेत. त्यात सर्दी, शिंका येणे, अंग दुखी, खोकला तसेच दम लागणे अशा प्रकारची लक्षणे असलेले रुग्ण हे अधिक आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांना आवाहन आहे की भन्हाचा ताप अधिक असताना घराबाहेर पडताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच व्हायरल इन्फेक्शनचा धोका असल्याने गर्दीत जाताना काळजी घ्यावी.”
दरम्यान नागरिकांना जर अशा कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास तत्काळ आपल्या जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे, असे ही डॉ. गायकवाड यांनी नमूद केले.
राज्यातील विविध ठिकाणी तापमानाचा पारा वाढला असून अनेक ठिकाणी उन्हाचे चटके तीव्रपणे जाणवत असल्याचे चित्र राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. असे असताना नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे किंवा उन्हात घराबाहेर पडणे टाळावे, तसेच कामानिमित्त बाहेर पडताना मात्र सोबत छत्री व पाण्याची बाटली ठेवण्याचे आवाहान डॉक्टरांनी केले आहे.

More Stories
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर
Pune: मेधा ताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही – रुपाली ठोंबरे पाटील
Pune: जैन बोर्डिंग जागा विक्रीव्यवहार प्रकरणाला जैसे थे ठेवण्याचे आदेश