बारामती, दि. २८ नोव्हेंबर, २०२४- सासवड येथील साईनाथ आईस फॅक्टरीला वीजचोरी प्रकरणात मा. दिवाणी न्यायालयाने दुसऱ्यांदा दणका दिला आहे. वीजचोरीपोटी आकारलेले देयक चुकीचे असल्याचा दावा फेटाळल्याने साईनाथ आईस फॅक्टरीला ३५ लाख ८६ हजारांचा दंड भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करता येणार नसल्याचे मा. न्यायालयाने बजावल्याने वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
महावितरणच्या भरारी पथकाने सासवड येथील साईनाथ आईस फॅक्टरीची वीजचोरी अनुक्रमे ६ एप्रिल २०२२ व १५ मार्च २०२३ अशी दोनवेळा उघडकीस आणली होती. पहिल्या वेळी आईस फॅक्टरीला २ लाख ३४ हजार २४३ युनीटची चोरी केल्याबद्दल ३५ लाख ८६ हजारांचा दंड आकारला होता. आकारलेल्या दंडाबाबत व वीजपुरवठा जोडून देण्याबाबत साईनाथ फॅक्टरीचे मालक श्री. नारायण दगडू पवार यांनी दिवाणी न्यायालयात अर्ज केला होता. दिवाणी न्यायालयाने बिल कायम ठेवले. त्यांनतर श्री. पवार यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली. यामध्ये आरोपीला काही काळ अटक सुद्धा झाली होती.
दरम्यान पहिले प्रकरण मा. दिवाणी न्यायालय (वरिष्ठस्तर) यांचे कोर्टात दावा चालू असताना साईनाथ आईस फॅक्टरीने दुसऱ्यांदा मीटर बायपास करुन वीजचोरी केली. महावितरणच्या भरारी पथकाने दि. १५ मार्च २०२३ रोजी ही वीजचोरी उघडकीस आणली. तेंव्हा या ग्राहकाला पुन्हा २२ लाख ३२ हजारांचा दंड आकारला. ही रक्कम ग्राहकाने भरली मात्र पहिल्या चोरीतील दंडाची रक्कम पूर्ण भरलेली नव्हती. त्यामुळे जोपर्यंत ३५ लाख ८६ हजारांचा दंड संपूर्ण भरला जात नाही तोपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करता येणार नसल्याचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन ग्राहकाचा अर्ज फेटाळून लावला. याउपर आईस फॅक्टरीने वीजचोरीचे देयक चुकीचे असल्याचा दावा केला. परंतु न्यायालयात देयक चुकीचे असल्याचे सिद्ध करता न आल्याने मे. साईनाथ आईसफॅक्टरीचा हा दावाही फेटाळण्यात आला. या प्रकरणी महावितरणतर्फे ॲड. सचिन खंडागळे व ॲड. गणेश डिंबळे यांनी बाजू मांडली.
More Stories
‘बारामती पॉवर मॅरेथॉन’साठी १५ डिसेंबर रोजी वाहतुकीत बदल