May 16, 2024

पुणे मेट्रो लाईन ३ च्या ३०० खांबांची उभारणी पूर्ण

पुणे, १५ फेब्रुवारी २०२३: हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन ३ या प्रकल्पाची खांब उभारणी अतिशय वेगवान पद्धतीने सुरू आहे. याचे फलित म्हणून हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील ‘पुणेरी मेट्रो’च्या ३०० खांबांची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे. विशेष नमूद करण्याजोगी बाब म्हणजे डिसेंबर २०२२ मध्ये या मार्गावरील २०० वा खांब उभारल्या नंतर पुढील ६० दिवसांच्या आत आणखी १०० खांबांची उभारणी पूर्ण करून त्रिशतकी टप्पा गाठण्यात प्रकल्प विकसकांना यश आलेले आहे. नजीकच्या काळात या कामाला आणखी वेग देऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी विकसक प्रयत्नशील राहणार आहेत.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन ३ चे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ‘पीएमआरडीए’ तर्फे सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर टाटा समूहाने हाती घेतले असून त्याच्या कार्यान्वनासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे.

मेट्रो लाईन ३ चा डोलारा समर्थपणे तोलून धरण्यासाठी उभारणी करण्यात येणारे खांब वैशिष्ट्यपूर्ण असणार आहेत. २००० मिमी व्यासाचा घाट असणारे हे गोलाकार खांब मेट्रो रेल्वे यंत्रणेच्या आरेखन मापदंडांशी पूर्णपणे सुसंगत असे साकारण्यात येत आहेत. भारतीय मानक ब्युरो (BIS) तसेच बांधकाम प्रक्रियेशी सुसंगत असलेल्या डिझाइनमध्ये सर्वोच्च सुरक्षा मानकांचे पालन केले जाईल याची दक्षता पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडतर्फे घेण्यात आलेली आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोच्या उभारणीमुळे सुलभ, वेगवान व स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या सर्वच टप्प्यांत गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत कुठलीही तडजोड न करण्याचे टाटा समूहाचे धोरण आहे.

पुणे मेट्रो लाईन ३ बाबत माहिती:

पुणे मेट्रो लाईन ३ हा हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा २३ किमीचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्प आहे, जो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) द्वारे टाटा समूहाच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (TUTPL) आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स (Siemens Project Ventures GmbH) यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमला प्रदान करण्यात आला आहे. हा प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनी द्वारे ३५ वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे.