July 22, 2024

फिडे व इंडियन ऑईलच्या मान्यवरांची येरवडा कारागृहाच्या सुवर्णपदक विजेत्या संघाला भेट

पुणे, 19 जून 2024: आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना(फिडे) यांच्या वतीने आयोजित आणि इंडियन ऑईल पुरस्कृत दुसऱ्या चेस फॉर फ्रीडम परिषदेला पुण्यात उत्साहात प्रारंभ झाला. या परिषदेचे औचित्य साधून फीडे व इंडियन ऑईलच्या पदाधिकाऱ्यानी येरवडा मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी फिडे आयोजित तिसऱ्या आंतर खंडीय बंदीवानांच्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणाऱ्या येरवडा कारागृहाच्या संघातील खेळाडूंची भेट घेतली. या संघातील खेळाडूंना इंडियन ऑईल पुरस्कृत “परिवर्तन प्रिझन टू प्राईड” या उपक्रमा अंतर्गत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.

या पदाधिकारऱ्यामध्ये इंडियन ऑईलच्या मनुष्य बळ विभागाच्या संचालिका रश्मी गोवील, फिडेच्या सामाजिक परिषदेचे सल्लागार मिखाइल कोरेनमन, फिडेच्या सामाजिक परिषदेचे आयुक्त आंद्रे वोगटिन, केंद्रीय कारागृह व सुधारगृह सेवा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर (आयपीएस), एआयसीएफचे सचिव देव पटेल, एमसीएचे कार्यकारी अध्यक्ष सिध्दार्थ मयुर, एमसीएचे मानद सचिव निरंजन गोडबोले, ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे, तसेच, कारागृह विभाग व इंडियन ऑईलचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.
त्याचप्रमाणे विविध देशांमधील कारागृह अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत करताना अमिताभ गुप्ता म्हणाले की, कारागृहातील बंदीवानांच्या पुनर्वसनासाठी आम्ही विविध उपक्रम राबवित असून त्याअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या संघाने सुवर्णपदक पटकावल्यामुळे या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

मिखाईन कोरेनमन यावेळी म्हणाले की, येरवडा कारागृहाचे अधिकारी आणि इंडियन ऑइल यांचे चेस फॉर फ्रीडम उपक्रमाबद्दल कौतुक केले पाहिजे. सुवर्णपदक विजेत्या संघाला भेटून आम्ही या परिषदेला प्रारंभ करत आहोत. समाजातील वेगळ्या वर्गात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी इंडियन ऑइल या प्रयोजकांची प्रशंसा केली.

इंडियन ऑइलच्या मनुष्य बळ संचोलिका रश्मी गोविल म्हणाल्या की, परिवर्तन प्रिझन टू प्राईड आणि नई दिशा या उपक्रमांना प्रारंभ केला. कारण कोणालाही दुसरी संधी मिळावी अशी आमची इच्छा आहे. तसेच, पुनर्वसनासाठी एक महत्वाचे माध्यम म्हणून क्रिडा क्षेत्राचा उपयोग होऊ शकतो यावर आमचा विश्वास आहे. येरवडा कारागृह व भोपाळ सुधारगृह या संघांनी मिळवलेल्या सुवर्णपदकांमुळे आमच्या उपक्रमाला मोठेच पाठबळ मिळाले आहे.

रश्मी गोविल यांनी कारागृहातील आजी माजी बंदिवानांनी चालविलेल्या उम्मीद- ए होप या विक्री केंद्र उपक्रमाची माहिती दिली. तसेच यावेळी फिडे व इंडियन ऑईल आणि येरवडा कारागृहाचा संघ यांच्यात मित्रत्वाचा बुद्धिबळ सामनाही खेळविण्यात आला.