October 21, 2025

कुत्र्यांनी घाण केले शहरातील पदपथ; चार महिन्यात केवळ १४ जणांवर कारवाई

पुणे, २९ एप्रिल २०२५: पाळीव श्वान शहरातील पदपथांवर फिरवले जात असताना ते शौच करत असल्याने पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या घनकचरा व स्वच्छता विभागामार्फत अशा बेशिस्त श्वान मालकांवर कारवाई करणे अपेक्षित असतांना अशा श्वान मालकांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या तीन वर्षात फक्त काही लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पुण्यात प्राणीप्रेमींची संख्या जास्त आहे. त्यात श्वान पाळणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहेत. हे नागरिक त्यांच्या श्वानांना सकाळी आणि सायंकाळी शौच करण्यासाठी रस्त्यावर फिरायला नेतात. ही कुत्री पदपथावर, रस्त्यावरच मलमूत्र विसर्जन करतात. पाळीव प्राण्यांच्या विष्ठा ही संबंधित मालकाने उचलने अथवा त्याची विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. मात्र, हे नागरिक रस्त्यावर विष्ठा पडून राहू देत असल्याने पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांच्या विष्ठेमुळे त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. या बाबत नागरिक महापालिकेकडे वारंवार तक्रारी करत असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, पालिकेच्या घनकचरा व स्वच्छता विभागाचे कर्मचारी ही कारवाई करण्यास कुचराई करत असल्याने पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहेत.

रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या कुत्र्यांच्या मालकांवर पुणे महानगर पालिकेने गेल्या तीन वर्षात मोजकीच कारवाई केली आहे. रस्त्यांवर घाण करणाऱ्या कुत्र्यांच्या मालकांना ५०० ते १००० रुपयांपर्यंत दंड ठोठावन्याची तरतूद आहे. मात्र, ही कारवाई करण्यास पालिकेचे कर्मचारी उदासीन आहेत. २०२३ मध्ये २२१ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ४५ हजार २६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर २०२४ मध्ये १९१ जणांवर कारवाई करत त्यांना ७९,०७८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर २०२५ मध्ये १४ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १४,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रस्त्यावर श्वानांना घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने पथकाची स्थापना केली आहे. सार्वजनिक ठिकाणे, रस्ते किंवा फूटपाथवर अनेक जण किंवा त्यांचे ‘केअर टेकर’ हे त्यांच्या घरातील कुत्र्यांना घेऊन फिरायला येतात. हे श्वान रस्त्यावर, फूटपाथवर किंवा सार्वजनिक ठिकाणी विष्ठा करतात. त्यामुळे परिसरअस्वच्छता होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पालिकेचे पथक अशांवर कारवाई करत असते. मात्र, गेल्या काही वर्षात मोजक्याच कारवाया करण्यात आल्या आहेत.

प्राणीप्रेमी नागरिकांना आता कुत्रे पाळण्यासाठी महापालिकेचा परवाना बंधनकारक आहे. हा परवाना देताना आरोग्य विभागाने कुत्रा सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार नाही, याची जबाबदारी पाळणाऱ्यांची असल्याची अट घातली आहे. शहरात पाळीव कुत्र्यांची संख्या एक ते दीड लाखांच्यावर असतांना काही हजार नगरिकांनीच हे परवाने पालिकेकडून घेतले आहे.

संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन यांनी सांगितले की, “पाळीव कुत्र्याने रस्त्यावर घाण केल्याचे आढळल्यास त्यांच्या मालकांना प्रत्येकी ५०० ते १,००० रुपये दंड केला जात आहे. याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या आरोग्य निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. रोज चार ते पाच जणांवर कारवाई केली जाते.”