May 15, 2025

महापालिकेची कारवाई: शहरातील ४१ शिक्षण संस्थांचा ३६९ कोटींचा मिळकतकर थकबाकी; सिंहगड इन्स्टिट्यूटची सर्वाधिक २५८ कोटींची देयकं

पुणे, २९ एप्रिल २०२५ : शहरातील ४१ शिक्षण संस्थांनी तब्बल ३६९ कोटींचा मिळकतकर थकविला आहे. त्यात, सर्वाधिक २५८ कोटी ९९ लाख रुपयांचा कर एकट्या सिंहगड इन्स्टिट्यूटचा आहे. तर, उर्वरीत थकबाकी इतर शैक्षणिक संस्थांची असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मिळकतकर, मिसिंग लिंक तसेच इतर कामांबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी सिंहगड संस्थेच्या काही कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांसह पाटील यांची भेट संस्थेकडून वेतन थकले असल्याने उपासमारीची वेळ आली असल्याचे सांगितले. तसेच, महापालिकेनेही या मिळकतींचा लिलाव केल्या संस्थेला पैसे मिळतील त्यातून वेतन दिले जाईल, अशी मागणी केली. या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी प्रशासनाकडून शहरातील सर्वच शैक्षणिक संस्थाच्या थकबाकीची माहिती या बैठकीत देण्यात आली.

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सिंहगड इन्स्टिट्यूटच्या शहराच्या वेगवेगळ्या भागात सुमारे १२८ मिळकती आहेत. त्यांची मूळ थकबाकी ७८ कोटी ३३ लाख असून त्यावर २८० कोटी ६६ लाख दंड आहे. तसेच, न्यायालयात त्यांच्या कारवाई करण्यास कोणताही स्टे नाही त्यामुळे महापालिकेने इन्स्टिट्यूटच्या प्रशासकीय कार्यालय असलेल्या मिळकती सील केल्या आहेत. तसेच, या निमित्ताने उर्वरीत शिक्षण संस्थाच्या थकबाकीचाही आढावा घेतला नाही.

सिंहगड संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी राज्याचे उच्च व शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे वेतन न झाल्याची दाद मागितली असली तरी त्याच्याशी महापालिकेचा काहीच संबध नाही. महापालिकेने सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मिळकती जप्त केल्या असल्या तरी त्या मिळकतींवर बॅंकाचे कर्ज असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लिलाव प्रक्रीयेत अडथळा येवू शकतो. त्यामुळे, भेट झाली असली तरीही त्यांचा महापालिकेशी कोणताही संबंध नसल्याचे या बैठकीत मनसे पदाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे.