May 15, 2025

डॉ. मानसिंग साबळे पुणे जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या अध्यक्षपदी

पुणे, ०७/०५/२०२५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी डॉ. मानसिंग साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशान्वान्ये हे पद त्यांना सोपवण्यात आले असून, या निर्णयामुळे जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हाधीकारी कार्यालय पुणे येथे वैद्यकीय उपचारांकरिता नागरिकांना अर्थसहाय्य सहज उपलब्ध व्हावेत, तसेच नागरिकांचा वेळ व पैसा याची बचत व्हावी या हेतूने मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणांची माहिती जिल्ह्यात उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधीकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे

डॉ. साबळे सध्या ससून रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची या पदावर अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रातील त्यांचा दांडगा अनुभव आणि गोरगरिबांविषयीची त्यांची तळमळ पाहता, ही नियुक्ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

गेल्या पाच वर्षांपासून डॉ. साबळे यांनी ससून रुग्णालयात आपल्या वैद्यकीय कौशल्याने असंख्य रुग्णांना मदत केली आहे.त्यांनी यापूर्वी ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. प्रशासकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा लाभ आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील रुग्णांना मिळणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नातून जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मदत पुरवली जाणार आहे. डॉ. साबळे यांनी यापूर्वीही अनेक गरीब रुग्णांना आर्थिक आणि वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या या कार्याचा अनुभव आता या नवीन जबाबदारीत निश्चितच उपयोगी ठरेल.

पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने धर्मादाय रुग्णालये आहेत आणि या पार्श्वभूमीवर डॉ. साबळे यांची नियुक्ती अधिक महत्त्वाची ठरते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष गरीब रुग्णांना योग्य वेळी योग्य मदत मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्याचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील समाजातील गरीब, गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळवून देणे, तसेच विविध आरोग्य योजनांविषयी माहिती देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हा आहे. ज्या रुग्णंना कोणत्याही शासकीय योजनेत समाविष्ट होता येत नाही, त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याचा निर्धार या कक्षाच्या माध्यमातून केला जाणार आहे.

डॉ. मानसिंग साबळे यांच्यासारख्या अनुभवी आणि संवेदनशील व्यक्तीची या पदावर नियुक्ती झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना निश्चितच मोठा दिलासा मिळेल, यात शंका नाही.