March 16, 2025

डॉ. प्रमोद चौधरी यांनी विनायक पै यांचे सीओईपीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून केले स्वागत

पुणे, दि. १९ ऑक्टोबर, २०२४ : जेष्ठ उद्योजक व भारताचे इथेनॉल मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ प्रमोद चौधरी यांनी काही वैयक्तिक कारणास्तव सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने नुकतीच सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे माजी विद्यार्थी, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक पै यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. आज डॉ प्रमोद चौधरी यांनी औपचारिकरीत्या नवनियुक्त अध्यक्ष विनायक पै यांचे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे अध्यक्ष म्हणून स्वागत केले. आज विद्यापीठामध्ये मावळते अध्यक्ष डॉ चौधरी यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी सीओईपी टेकचे कुलगुरू प्रा. सुनील भिरूड, कुलसचिव डॉ डी एन सोनावणे, नियामक मंडळाचे सदस्य व विद्यापीठाच्या विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

डॉ प्रमोद चौधरी यांनी या वेळी विद्यापीठाला रु १ कोटी रुपयांची देणगी जाहीर केली. या निधीचा विनियम कसा करावा याचा संपूर्ण अधिकार त्यांनी विद्यापीठ प्रशासन व नियामक मंडळाला दिला आहे. याप्रसंगी बोलताना डॉ चौधरी म्हणाले, “मी या संस्थेचा माजी विद्यार्थी नसलो तरीही संस्थेचे महत्त्व मला माहित आहे. सीओईपी हा एक ब्रँड असून संस्थेचे एनआरआयएफ रँकिंग वाढविण्याच्या दृष्टीने काम करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला.” नजीकच्या भविष्यात विद्यापीठाने आणखी जास्त प्रमाणात माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहीचत त्यांचा फायदा विद्यार्थी व संस्थेसाठी करावा असा सल्लाही डॉ चौधरी यांनी दिला. आरोग्याच्या अपरिहार्य कारणास्तव संस्थेसाठी अनेक गोष्टी करता आल्या नाहीत याची खंत डॉ चौधरी यांनी व्यक्त केली.

चिखली येथे उभारत असलेल्या विद्यापीठाच्या नव्या परिसराची उभारणी, सीओईपीच्या बदलासाठीचे प्रयत्न, आंतरराष्ट्रीय पातळीवर माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधणे आणि संस्थेचे एनआरआयएफ रँकिंग वाढविण्याच्या दृष्टीने डॉ प्रमोद चौधरी यांनी दाखविलेल्या मार्गाने आम्ही यापुढेही चालत राहू असे प्रा भिरूड म्हणाले.

नियामक मंडळाचा सदस्य इथपासून मंडळाचा अध्यक्ष अशा प्रत्येक वेळी स्वत: डॉ चौधरी यांनी माझे नाव सुचविले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आज त्यांच्या जागी काम करण्याची मिळत असलेली संधी ही माझ्यासाठी आनंददायी बाब आहे, असे सांगत विनायक पै म्हणाले, “डॉ प्रमोद चौधरी यांनी पाहिलेले सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे रँकिंग वाढविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात आम्ही सर्वचजण एकत्रितपणे व एकमताने पूर्ण करण्यावर भर देऊ. यासोबतच येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा संस्थेतेल शैक्षणिक अनुभव अधिक चांगला करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”

डॉ डी एन सोनावणे यांनी प्रास्ताविक करीत सूत्रसंचालन केले. यावेळी नियामक मंडळाच्या सदस्यांनी देखील मनोगत व्यक्त केले.