May 3, 2024

पुणे परिमंडलातील १६७० ग्राहकांना अवघ्या २४ ते ४८ तासांत वीजजोडण्या

पुणे, दि. २१ ऑगस्ट २०२३: पुणे परिमंडल अंतर्गत अस्तित्वात असलेल्या यंत्रणेमधून तब्बल १६७० घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांकडे अवघ्या २४ ते ४८ तासांमध्ये महावितरणकडून नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये २४ तासांत ८२३ तर ४८ तासांमधील ८४७ नवीन वीजजोडण्यांचा समावेश आहे.

नवीन वीजजोडण्या देण्यास महावितरणने मोठा वेग दिला असून पुणे परिमंडलामध्ये गेल्या जानेवारी ते १४ ऑगस्टपर्यंत साडेसात महिन्यात तब्बल १ लाख ४५ हजार ८२४ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. यामध्ये घरगुती- १ लाख २५ हजार २११, वाणिज्यिक- १६ हजार ६२१, औद्योगिक- २३०४ आणि १६८८ इतर वर्गवारीतील वीजजोडण्यांचा समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वीजजोडण्यांना वेग देण्याची सूचना केली आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी याबाबतची कार्यवाही त्वरित करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच पुरेशा प्रमाणात नवीन वीजमीटर देखील उपलब्ध करून दिले आहेत. वीजमीटरची उपलब्धता व नवीन वीजजोडण्यांबाबत संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांच्याकडून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.

यासोबतच अस्तित्वात असलेल्या वीजयंत्रणेमधून वीजभाराच्या मागणीसह वीजजोडणी देणे शक्य आहे अशा ठिकाणी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून फर्म कोटेशनच्या रकमेचा भरणा केल्यास शहरी भागात अवघ्या २४ तर ग्रामीण भागात ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यास वेग देण्यात आला आहे. याबाबतचे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सर्व कार्यालयांना दिले होते.

त्यानुसार पुणे परिमंडल अंतर्गत २४ ते ४८ तासांमध्ये प्रामुख्याने घरगुतीसह वाणिज्यिक व औद्योगिक १६७० नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे शहरात २४ तासांमध्ये २९८ व ४८ तासांत ३७१ अशा ६६९ नवीन वीजजोडण्यांचा तसेच पिंपरी चिंचवड शहरात २४ तासांत २१३ तर ४८ तासांत १८६ अशा ३९९ वीजजोडण्यांचा आणि ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांत २४ तासांत ३१२ तर ४८ तासांत २९० अशा ६०२ वीजजोडण्यांचा समावेश आहे.

मनोगत – राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल- महावितरणकडून ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार सेवा देण्यास प्रारंभ झाला आहे. पुणे परिमंडलामध्ये मागेल त्यांना नवीन वीजजोडणी ताबडतोब देण्यास वेग देण्यात आला आहे. यामध्ये जेथे शक्य आहे तेथे कोणत्याही प्रकारचा विलंब न करता शहरी व ग्रामीण भागात २४ ते ४८ तासांत नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येत आहे.