December 14, 2024

चित्रकार अनंत भिडे यांच्या तैलचित्रांचे प्रदर्शन

पुणे, दि. २८ नोव्हेंबर, २०२४ : हौशी चित्रकार असलेल्या अनंत भिडे यांच्या ‘अनंत आकृती’ या तैलचित्रांचे प्रदर्शन शनिवार दि. ७ डिसेंबर रोजी भूगाव येथील फॉरेस्ट ट्रेल्समधील अरेना स्पोर्ट्स हॉल या ठिकाणी सकाळी ११ ते सायं ७ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे याची कृपया नोंद घ्यावी.

इलेक्ट्रिक इंजिनीअर असलेले पुण्यातील अनंत भिडे यांनी अनेक वर्षे डच मल्टी नॅशनल संस्थेत विविध उच्च पदांवर काम केले असून नुकतेच युरोप व दक्षिण पूर्व आशिया खंडाचे प्रमुख म्हणून ते पदमुक्त झाले आहेत. आपल्या निवृत्ती पूर्वी म्हणजेच दहा वर्षांपूर्वी विकएंड अॅक्टिव्हिटी म्हणून अनंत भिडे यांनी चित्रकलेला सुरुवात केल्यानंतर आज चित्रकला त्यांच्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग बनली आहे हे विशेष.

‘अनंत आकृती’ या प्रदर्शनामध्ये भिडे यांनी आपला आजवरचा चित्रकलेचा प्रवास मांडला असून या निमित्ताने तो रसिकांना पाहता येणार आहे. सदर प्रदर्शनामध्ये भिडे यांनी विविध चेहेरे, बौद्ध साधू, निसर्गचित्रे आणि आपल्या प्रवासातील आठवणी रेखाटल्या आहेत. त्यांच्या या प्रदर्शनामध्ये मुख्यत: तैलचित्रांचा समावेश आहे.