मुंबई/पुणे , १ जुलै २०२५: राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्तारित कामाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडली. बावधन बुद्रुक येथील ६ एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य संग्रहालय उभारण्यासाठी नामांकित आर्किटेक्चर नेमणुकीसाठी प्रशासकीय समितीची स्थापना, सविस्तर आराखड्यानंतर निधीची तरतूद करणे, तसेच नव्याने उभारल्या जाणाऱ्या ‘म्युझियम सिटी’ला राजा दिनकर केळकर यांचेच नाव कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे.
वैभवशाली इतिहासाचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या केळकर संग्रहालयात १४ व्या शतकापासूनच्या २०,००० हून अधिक वस्तूंचा संग्रहीत ठेवा आहे. सध्या जागेअभावी केवळ ११ टक्के वस्तू जनतेसाठी खुल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संग्रहालयाच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडून यापूर्वीच बावधन बुद्रूक येथे ६ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, सांस्कृतिक कार्य अपर मुख्य सचिव विकास खरगे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्तीय सुधारणा सविच शैला ए, वित्त व नियोजन सचिव राजेश देशमुख तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी उपस्थित होते.
बैठकीबाबत माहिती देताना रासने म्हणाले, “नवीन संग्रहालयाचे बांधकाम दर्जेदार, आकर्षक आणि शाश्वत पद्धतीने व्हावे, अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून शिवकालीन, पेशवेकालीन आणि पुण्याच्या वैभवशाली वारशाच्या जतनासाठी माझा सतत प्रयत्न आहे. शनिवारवाड्यासह अनेक ऐतिहासिक वास्तूंना पुनरुज्जीवित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. भविष्यात या ‘म्युझियम सिटी’ची ओळख जागतिक पातळीवर पोहोचेल, असा विश्वास आहे”.
More Stories
पुणे मेट्रोच्या ताफ्यात लवकरच नवीन १२ मेट्रो ट्रेन सेट
पुणे: जवानाच्या वेळीच धाव घेतल्याने टळली दुर्घटना; खिडकीत अडकलेल्या चार वर्षाच्या मुलीचे वाचवले प्राण
Pune: डिजे लावणार्या गणेश मंडळांना मदत नाही, डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार