September 24, 2025

एमएसएलटीए 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या रामकुमार रामनाथन याला दुहेरी मुकुटाची संधी

मुंबई, 25 नोव्हेंबर 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने एमएसएलटीए 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत भारताच्या रामकुमार रामनाथन याने दुहेरी गटातील विजेतेपदा बरोबरच एकेरी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. दुहेरीत पुरव राजा व रामकुमार रामनाथन यांनी विजेतेपद संपादन केले.
जीए रानडे टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्य फेरीत भारताच्या तिसऱ्या मानांकित रामकुमार रामनाथन याने आपली विजयी मालिका कायम ठेवत जर्मनीच्या दुसऱ्या मानांकित लुई वेसेल्सचा 7-6(3), 6-3 असा पराभव करून सनसनाटी निकालासह अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. हा सामना 1तास 25मिनिटे चालला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या सिद्धार्थ विश्वकर्माने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अमेरिकेच्या हॅरिसन अॅडम्सचा 7-6(5), 6-4 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना 1तास 39मिनिटे चालला.
दुहेरीत अंतिम फेरीत पुरव राजा व रामकुमार रामनाथन या अव्वल मानांकित भारतीय जोडीने अमेरिकेच्या हॅरिसन अॅडम्स व युक्रेनच्या व्लादिस्लाव ऑर्लोव्ह यांचा 6-3, 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या जोडीला 1550डॉलर व 25 एटीपी गुण, तर उपविजेत्या जोडीला 900 डॉलर व 16एटीपी गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि बॅबोलटच्या निर्यात विभागाचे संचालक रेने व्हॅन डेन हुवेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वैद्य, कार्यकारिणी सदस्य लव कोठारी, आयटीएफ सुपरवायझर शितल अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: मुख्य ड्रॉ: एकेरी: उपांत्य फेरी:
रामकुमार रामनाथन (भारत)[3]वि.वि.लुई वेसेल्स (जर्मनी)[2]7-6(3), 6-3;
सिद्धार्थ विश्वकर्मा(भारत)वि.वि.हॅरिसन अॅडम्स (अमेरिका) 7-6(5), 6-4;
दुहेरी: अंतिम फेरी:
 पुरव राजा(भारत)/रामकुमार रामनाथन(भारत)[1] वि.वि.हॅरिसन अॅडम्स (अमेरिका)/व्लादिस्लाव ऑर्लोव्ह(युक्रेन)6-3, 6-3.