May 4, 2024

औद्योगिक संघटनांनी शैक्षणिक संस्था उभारणीत पुढाकार घ्यावा – डॉ श्रीधर शुल्का

पुणे, दि. २२ एप्रिल, २०२४: आज तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर क्षेत्रात आपण सिलिकॉन व्हॅलीचे नाव घेतो. मात्र जे लोक सिलिकॉन व्हॅलीमध्ये कामासाठी जातात ते राहण्यासाठी कायमच शिक्षणाची उत्तम सोय असलेल्या कूपरटिनो या भागाची निवड करतात. त्यामुळे आता नजीकच्या भविष्यात एखाद्या भागाचा औद्योगिक विकास करावयाचा असल्यास औद्योगिक संघटनांनी स्थानिक पातळीवर काम करीत उत्तम दर्जाच्या शैक्षणिक संस्था उभारणीत पुढाकार घ्यावा, असे मत जीएस लॅबचे व के पॉइंट टेक्नोलॉजीजचे सहसंस्थापक व अध्यक्ष डॉ श्रीधर शुक्ला यांनी व्यक्त केले.

देशातील शहरांचा विचार केल्यास पुणे हे शहर राष्ट्रीय सकल उत्पनात देशातील पाचव्या क्रमांकाचे शहर आहे. आज पुणे जिल्ह्यामध्ये ७ हजार ३०० शाळा आहेत. मात्र पुण्याला औद्योगिकदृष्ट्या आणखी प्रगत करावयाचे असल्यास ‘सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा असलेला जिल्हा’ अशी पुण्याची ओळख आणखी दृढ करावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले. सॉफ्टवेअर एक्स्पोटर्स असोसिएशन ऑफ पुणे अर्थात सीपच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टीन येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ श्रीधर शुक्ला यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

पर्सिस्टन्ट सिस्टिम्सचे सहसंस्थापक दादा देशपांडे यांच्या हस्ते पुणेरी पगडी आणि मानचिन्ह या स्वरूपात असलेला हा पुरस्कार शुक्ला यांना प्रदान करण्यात आला. सदर पुरस्काराचे हे दुसरे वर्ष होते. सीपच्या अध्यक्षा विनीता गेरा, उपाध्यक्ष शिवराज साबळे, सचिव विद्याधर पुरंदरे, माजी अध्यक्ष प्रशांत के एस आणि रामप्रसाद एस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नितीन देशपांडे, स्वप्नील देशपांडे, पराग बर्वे, वृषाली कुलकर्णी व आशुतोष पारसनीस यांचे विशेष सहकार्य कार्यक्रमासाठी लाभले.

आज देशामध्ये १ कोटींहून अधिक शिक्षक असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शिक्षकांवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे, असे सांगत डॉ श्रीधर शुक्ला पुढे म्हणाले की, “भारतात आज २५ कोटींहून अधिक विद्यार्थी तर १५ लाखांच्या जवळपास शाळा आहेत. यापैकी ८५% शाळा या ग्रामीण भागात तर १५% शाळा या शहरी भागात आहेत. यामध्ये १० लाख शाळा या सरकारी तर ४ लाख शाळा या खाजगी आहेत. सरकारी शाळांमध्ये चांगले शिक्षण, चांगले शिक्षक असूनही पालक आणि विद्यार्थ्याचा कल हा परवडणाऱ्या खाजगी शाळांकडे आहे. सीबीएससी अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय शाळा आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेले शिक्षण या ‘टॅग’ वर हा कल अवलंबून आहे.”

आजच्या धकाधकीच्या जीवनात पालक आपल्या पाल्याला आवश्यक तेवढा वेळ देऊ शकत नाही, याउलट शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जास्त संपर्कात असल्याने आणि विद्यार्थ्यांसोबत जास्त वेळ घालवत असल्याने शिक्षकांचा प्रभाव हा विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात असतो. असे असले तरी आपल्याकडे शिक्षकांवर हवे तितके लक्ष केंद्रित केले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षकांवरही लक्ष केंद्रित करणे, ही काळाची गरज आहे याकडेही डॉ शुक्ला यांनी लक्ष वेधले.

दादा देशपांडे यांनी पर्सिस्टन्ट सिस्टिम्स व सॉफ्टवेअर एक्स्पोटर्स असोसिएशन ऑफ पुणे या संस्थांच्या उदयामागील कारणे आणि परिस्थिती उपस्थितांसमोर मांडली.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात ‘सीप स्टार पुरस्कार’ देखील प्रदान करण्यात आले. यावेळी ‘बेस्ट डीईआयबी प्रॅक्टिसेस’ विभागात हारबिंगर गृप, ‘मेकिंग अ डिफरन्स इन पीपल प्रॅक्टिसेस’ विभागात क्लेअरवोयंट इंडिया आणि इवोलंट हेल्थ इंटरनॅशनल, ‘बेस्ट टेक्नोलॉजी अँड इनोव्हेशन्स प्रॅक्टिसेस’ विभागात सायटेल स्टॅटेस्टीकल सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस प्रा. लि (लार्ज बिझिनेस) आणि रुबीस्केप्स (इमर्जिंग बिझिनेस) यांना, ‘बिगेस्ट लीप इन एआय’ विभागात प्रिव्हासेरा तर ‘सुपर अचिव्हर’ विभागात फास्ट ग्रोथ कंपनी यांचा सन्मान करण्यात आला.

सीपच्या कार्यकारी समितीचे सदस्य अभिजित अत्रे यांनी आभार मानले.