July 27, 2024

मुंबईच्या दुर्घटनेनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत लोखंडी होर्डिंग कोसळले; जीवित हानी नाही

मोशी, १६ मे २०२४: लोकांच्या मनात अजून सुद्धा ताज्या असणाऱ्या मुंबईच्या घटनेनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिके हद्दीत मोशी मध्ये एक लोखंडी सांगाडा असलेले होर्डिंग पडले आहे. हे होर्डिंग संध्याकाळी ४.३० वाजता जय गणेश साम्राज्य चौक, मोशी येथे पडले असून यात एकही जीवित हानी नाही.

वॉर्ड अधिकारी अण्णा बोदडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे होर्डिंग अधिकृत असून ते २० बाय ४० फुट होते. पिंपरी चिंचवड मध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वाऱ्यामुळे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या टेम्पोवर होर्डिंग पडले.

सदर होर्डींगचे परवाना धारक आनंद ॲडव्हर्टायझिंगचे श्री आनंद गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शहरातील सर्व होर्डिंग्जबाबत संबंधितांची बैठक शुक्रवार दि १७ मे रोजी आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत होणार आहे. तसेच शहरातील सर्व होर्डींग चे स्ट्रक्चरल ॲाडीट करण्यात येत आहे.

आज झालेल्या या घटनेत सदर होर्डींग हे तेथे असलेल्या टेम्पोवर पडल्याने किरकोळ नुकसान झाले आहे.
सदर घटनेची आयुक्त शेखर सिंह यांनी तातडीने दखल घेवून सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर व उपायुक्त संदीप खोत यांना घटनास्थळ पाहणी च्या सूचना दिल्या . शहरातील अनधिकृत होर्डींगचे सर्वेक्षण सुरू असून सोमवार पासून त्यावर कारवाईची मोहिम सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले .