September 12, 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक स्वबळावर – अजित पवारांचा सूचक इशारा

पुणे, ७ मे २०२५: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून लढायची की स्वबळावर, याचा निर्णय राज्य पातळीवर घेतला जाईल. मी तुम्हाला जागे करण्यासाठी आलो आहे. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सांगतो. युतीची वाट न बघता तुम्ही कामाला लागा. प्रत्येक वार्डात राष्ट्रावादी काँग्रेस दिसली पाहिजे, असे सूचक वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाची शुक्रवारी बैठक झाली. त्यावेळी या बैठकीमध्ये पवार बोलत होते. शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, रुपाली ठोंबरे, हाजी फिरोज शेख, अक्रूर कुदळे यांच्यासह अन्य आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘सन १९९९ ते २०१४ पर्यंत काँग्रेस बरोबर आघाडी होती. मात्र तेव्हाही स्थानिक पातळीवरील निर्णय घेण्याचे अधिकार त्या-त्या जिल्ह्यांना देण्यात आले होते. आगामी निवडणुकांबाबत आम्ही राज्यस्तरावर निर्णय घेऊ तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. पण त्याची वाट न बघता तुम्ही कामाला लागा. वार्ड रचना कशीही होऊ द्या, तुम्ही काम करत रहा. पद घेऊन काहीच काम करायचे नाही, असे करू नका. केवळ भाषण करून मतदार जोडले जात नाहीत. तर कृतीही चांगली हवी. आपल्या सहकार्यांना त्रास होईल असे वक्तव्य करू नका,’’ अशा शब्दांत पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.

माझ्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली जाईल…
माझा चेहरा बरा आहे. म्हणून माझ्या चेहऱ्यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक आपण लढवणार आहोत. असे सांगून पवार म्हणाले, ‘‘शहरातील आठ विधानसभा मतदारसंघनिहाय एक-एक मंत्र्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. आठही मतदारसंघात मेळावे होतील, महिला, तरुणांना यावेळी संधी दिली जाईल.