May 14, 2025

विमानतळ पोलिसांच्या ‘जनसुरक्षा क्रिकेट कप’ स्पर्धेत लोहगाव इलेव्हन विजयी

राजेश घोडके
पुणे, २९ मार्च २०२५: विमानतळ पोलीस ठाण्याने आयोजित केलेल्या ‘जनसुरक्षा क्रिकेट कप २०२५’ स्पर्धेत लोहगाव इलेव्हनने विजेतेपद पटकावले. विमाननगर येथील सिम्बायोसिस कॉलेज ग्राउंडवर २७ आणि २८ मार्च रोजी ‘कम्युनिटी पोलिसिंग’ आणि ‘कनेक्टिंग युथ्स’ या उपक्रमांतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

झोन-४ मधील १६ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यात विमानतळ, खराडी, वाघोली, येरवडा, विश्रांतवाडी, खडकी, बाणेर पोलीस ठाण्यांच्या संघांसह ‘अखिल पत्रकार महासंघ पुणे’ आणि विमाननगर परिसरातील ८ स्थानिक संघांचा समावेश होता.

अंतिम सामन्यात लोहगाव इलेव्हनने जे बॉईज क्रिकेट टीम रामवाडीचा पराभव करत विजेतेपद पटकावले. विमानतळ पोलीस स्टेशन क्रिकेट टीमने तिसरे स्थान मिळवले. विजेत्या संघांना अनुक्रमे २१,०००, ११,००० आणि ७,००० रुपयांचे रोख पारितोषिक आणि चषक देण्यात आले. विमानतळ पोलीस स्टेशन संघाचा कर्णधार सपोनि विजय चंदनला ‘सर्वोत्तम फलंदाज’ आणि जे बॉईज संघाचा अरविंद ठाकूरला ‘सर्वोत्तम गोलंदाज’ म्हणून गौरविण्यात आले.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी खेळाडू आणि नागरिकांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी, येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती ढाकणे,
विमानतळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) आशालता खापरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.