हिंजेवाडी, १९ मार्च २०२५ ः हिंजवडी फेज १ रस्त्यावर बुधवारी (ता. १९) सकाळी नऊच्या सुमारास व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला अचानक आग लागली. या भीषण अपघातात चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा जण जखमी असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
सुभाष भोसले (वय ४२),शंकर शिंदे (६०),गुरुदास लोकरे (४०) आणि राजू चव्हाण(४०) अशा या मत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. तर गंभीर जखमी झालेल्यांमध्ये प्रदीप बाबुराव राऊत, विकास गोडसे, मंजिरी अडकर, नंदकुमार सावंत, विठ्ठल दिघे आणि विश्वास लक्ष्मण खानविलकर यांचा समावेश आहे.
घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ही मिनीबस हिंजवडी फेज १ रस्त्यावर आली असता, चालकाच्या पायाखालील बाजूला अचानक धूर येऊ लागला व काही क्षणांतच ही आग तीव्र झाली. त्यानंतर चालकाने त्वरीत बस थांबवली आणि समोरच्या दारातून तो व इतर काही कर्मचारी बाहेर पडले. मात्र, मागच्या सीटवर बसलेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत आग पोहोचल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. बसचा मागील दरवाजा उघडता न आल्याने ते आतमध्येच अडकले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता इतकी भीषण होती की चार कामगारांना वाचवता आले नाही. आग विझल्यानंतर जवानांना बसमध्ये कामगारांचे जळालेले मृतदेह आढळून आले. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला.
हिंजवडी पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून प्राथमिक माहितीनुसार, बसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज आहे. तसेच, मागील दरवाजा उघडण्यात अडचण आल्याने कामगारांचा मृत्यू झाला. बसच्या मागील दारात काही बिघाड झाला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.
या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. सकाळी कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत होईल, याचा कोणीही विचार केला नव्हता. मृत कामगारांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वाहन लुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर-
हिंजवडीतील या दुर्घटनेने पुन्हा एकदा वाहन सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच, कर्मचाऱ्यांचे वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये आग विझवण्याचे यंत्र असणे अनिवार्य करावे. आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर पडता यावे, यासाठी योग्य प्रशिक्षण देणेही गरजेचे आहे. या दुर्घटनेतून योग्य तो धडा घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
More Stories
पुणे: कल्पतरू हार्मनी सीएचएसमध्ये २०० किलोवॅट सौर प्रकल्पाचे उद्घाटन
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांना गती देणारा नवा टप्पा म्हणजे ‘चऱ्होली’ व ‘माण’ ई-बस डेपोः अजित पवार
पुणे: भक्तीशक्ती चौक ते पीसीएमसी मेट्रो मार्गिकेतील पहिले ‘सेगमेंट’ बसवण्याचे काम सुरु