September 20, 2025

उद्या पुणे जिल्ह्यात ३ ठिकाणी होणार मॉकड्रील; युद्धजन्य परिस्थितीत नागरी सुरक्षेचा सराव

पुणे, ६ मे २०२५: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांनी प्राण गमावले असून संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेनंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला असून युद्धजन्य परिस्थिती उद्भवू शकते. अशा पार्श्वभूमीवर, नागरी सुरक्षेची तयारी तपासण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील काही राज्यांमध्ये मॉकड्रील आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे जिल्ह्यात उद्या, ७ मे रोजी दुपारी ४ वाजता विधानभवन (पुणे शहर), तळेगाव नगरपरिषद आणि मुळशी पंचायत समिती येथे मॉकड्रील होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डूडी म्हणाले, “या मॉकड्रीलचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि युद्धजन्य परिस्थितीत काय खबरदारी घ्यावी, याचे प्रात्यक्षिक दाखवणे हा आहे. या सरावात सिव्हिल डिफेन्स, एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल, पोलीस विभाग, जिल्हा प्रशासन, महापालिका, अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि काही महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत.”

ते पुढे म्हणाले की, “लोकांनी या मॉकड्रील दरम्यान घाबरून जाऊ नये. हे केवळ आपली सज्जता तपासण्यासाठीचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. उद्या विधानभवन परिसरात भोंगे वाजवून हवाई हल्ल्याची सूचना दिली जाईल, मात्र इतर ठिकाणी भोंगे वाजवले जाणार नाहीत. शहरात सध्या ७५ ठिकाणी भोंग्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र उद्याचा मॉकड्रील विधानभवनपुरताच मर्यादित आहे.”

या सरावाद्वारे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत शिस्त आणि वेळेवरची कृती हाच जीव वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे डूडी यांनी स्पष्ट केले.