December 14, 2024

मुख्यमंत्रीपदाबाबत मुरलीधर मोहोळ यांचे महत्वाचे विधान

पुणे, ३० नोव्हेंबर २०२४: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होण्याची शक्यता असताना त्यांच्या निवडीसाठी विलंब होत आहे. त्यामुळे या जागेवर केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा गांभीर्याने विचार केला जात असल्याची चर्चा दोन दिवसापासून समाज माध्यमावर रंगलेली आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून देखील याबाबत चर्चा सुरू आहे. आता मुरलीधर मोहोळ यांनीच ती स्वतः मुख्यमंत्री होणार आहेत की नाही याबाबत भूमिका स्पष्ट केलेली आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला २३० जागांचे बहुमत मिळालेले आहे यामध्ये भाजपला १३२ शिवसेनेला ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ४१ जागा मिळाल्या आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. हे स्पष्ट झाले असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. ते सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील अशी शक्यता वर्तवली जात असताना निकाल लागून सात दिवस झाले. मात्र पक्ष नेतृत्वाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. तसेच मंत्रीपद वाटपावरून देखील घोळ सुरू आहे. फडणवीस यांच्या नावाचा विलंब होत असताना पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे. याबाबत विचारणा करणारे फोन मोहोळ यांना गेलेले आहे.त नागरिकांकडून व कार्यकर्त्यांकडून याबाबत चौकशी सुरू झाल्याने स्वतः याबाबत मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट करून दिलेले आहे. मुरलीधर मोहोळ म्हणाले, समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे.

आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.

आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे.