October 5, 2024

‘पुतळा नव्हे, अस्मिता कोसळली’: पुण्यात महाविकास आघाडीचे आंदोलन

पुणे, २ सप्टेंबर २०२४: “पुतळा नव्हे, अस्मिता कोसळली’, “शिवद्रोह्याला माफी नाही’, “छत्रपतींचा अपमान करणाऱ्या शिवद्रोहींचा धिक्कार असो’, “महायुती सरकार ताशी ४५ किलोमीटर वेगाने पडणार’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीतर्फे राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेप्रकरणी महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट यांच्यातर्फे केंद्र व राज्य सरकार विरुद्ध लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, ॲड. अभय छाजेड, आबा बागूल आदी उपस्थित होते.

मोरे म्हणाले, “केंद्र, राज्यात असलेल्या भाजपने महापालिकेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागायची आणि दुसरीकडे महापुरुषांचा अपमान करण्याचे काम भाजपने केले आहे. महाराजांनी बांधलेला राजकोट किल्ला ३५० वर्ष समुद्राच्या लाटा झेलत अभेद्य उभा आहे. याच किल्ल्यावर उभारलेला महाराजांचा पुतळा २६६ दिवसही टिकू शकत नाही. त्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला आहे, हे स्पष्ट दिसते. म्हणूनच या सरकारनेच आता राजीनामा द्यावा.’

जगताप म्हणाले, “”स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ हा जगातील सर्वात उंच पुतळा असूनही त्यावर अतिवेगवान वाऱ्याचा परिणाम होत नाही. तर, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर ४५ किलोमीटर वेगवान वाऱ्याचा परिणाम कसा झाला ? पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच विकृत राजकारण केले जात आहे. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राज्य सरकारने राजीनामा द्यावा’

शिंदे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला तरी, एकाही हिंदुत्ववादी संघटनेने या घटनेविरूद्ध आवाज उठवलेला नाही. एरवी किरकोळ कारणावरून रस्त्यावर येणाऱ्या या संघटना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतची दुर्घटना घडते, तेव्हा कुठे जातात. या घटनेतील दोषींवर सरकारने कडक कारवाई करावी.