October 3, 2024

गणेशोत्सव व ईद-ए-मिलादुनब्बी निमित्त अकबर भाई मुल्ला यांच्या वतीने धार्मिक एकात्मतेचे दर्शन !

पिंपरी, ता. 16/09/2024: गणेशोत्सव व ईद-ए-मिलादुनब्बी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे व्यवस्थापन सेलचे अध्यक्ष अकबर भाई मुल्ला यांच्या वतीने धार्मिक एकात्मतेचे दर्शन म्हणून पिंपरीतील सावली केंद्र येथे गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी शहरातील पत्रकारांचा सत्कार समारंभ देखील पार पडला. यावेळी माजी नगरसेवक काळुराम पवार व माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना काळुराम पवार म्हणाले, “आपल्या समाजात अकबर भाई मुल्ला हे अत्यंत मोलाचे कार्य करीत आहे. सामाजिक कार्य असो वा इतर काही कार्य हे अकबर भाई प्रामुख्याने पार पाडतात. आज सर्व धर्मीय गरजवंतांना अन्नधान्य किट वाटप करून एक चांगला उपक्रम राबविला. तसेच समाजातील प्रामुख्याने काम करणाऱ्या धाडसी पत्रकारांचा सन्मान त्यांच्या वतीने करण्यात आला. हे अत्यंत कौतुकाची बाब आहे. अकबर भाई हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहतात, त्यांनी नेहमीच वेळोवेळी गरजवंतांना मदत केली आहे. आगामी काळात महानगरपालिकेत त्यांना येथील प्रभागाचे नेतृत्व करण्याची आपण संधी देणार आहोत. त्यासाठी आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा असेल,” असेही काळूराम पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.

याप्रसंगी जितेंद्र ननावरे म्हणाले, “अकबर भाई मुल्ला हे नेहमीच उत्तम कामगिरी करत असतात. तसेच आगामी काळात त्यांना संधी मिळाल्यास महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून ते अशीच उत्तम कामगिरी करतील,” असाही विश्वास त्यांनी दर्शविला.

याप्रसंगी अकबर भाई मुल्ला यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, सर्व धर्मसमभाव मांडणारा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि या पक्ष अंतर्गत मी ईद-ए-मिलादुन्नबी व गणेशोत्सव निमित्त हा सामाजिक उपक्रम राबवित आहे. या दोन्ही पवित्र सणांच्या दिवशी कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती अन्नधान्य व इतर सुविधेपासून वंचित राहू नये, यासाठी हा एक छोटासा उपक्रम राबविला असल्याचे अकबर भाई मुल्ला यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमात पत्रकारांच्या विषयी त्यांनी बोलताना सांगितले की, पत्रकार हा समाजातील चांगल्या वाईट घटनांचे वृत्तांकन करण्यासाठी वेळ, काळ पाहत नाही. चांगल्या कामाच्या पाठीमागे पत्रकार हा ठामपणे उभा राहतो, यासाठी आपण या निमित्ताने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा ही सन्मान करत असल्याचे वक्तव्य केले.

यावेळी अकबर भाई मुल्ला यांनी माजी नगरसेवक जितेंद्र नन्नवरे, माजी नगरसेवक काळूराम पवार यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मान केला. तसेच पत्रकार दादाराव आढाव, पत्रकार संतोष जराड, पत्रकार शबनम सय्यद, पत्रकार महेश मांगावडे, पत्रकार अमोल डंबाळे, पत्रकार कलिंदर शेख यांचा सन्मान सत्कार करण्यात आला.

सावली केंद्रात निराधार व्यक्तींना आसरा दिला जातो, या निराधार व्यक्तींसाठी अकबर भाई मुल्ला यांच्या वतीने ५० किलो तांदूळ देण्यात आले. तसेच २०० कुटुंबाना अन्नधान्य किट यामध्ये जीवनावश्यक वस्तू देण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी अनेक महिलांनी उपस्थिती दर्शविली अनेक गरजूंना यावेळी अन्नधान्याची कीट मदत म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यवस्थापन सेलच्या कार्याध्यक्ष अंजू बेंजामिन, अकबर भाई मुल्ला यांचे कार्यकर्ते आयुब शेख, शुभम दोसिया, फरदीन शेख, पवन, गौतम, यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.