पुणे, दि. ७ जुलै २०२५ – “वैष्णव संज्ञेला वारकरी परंपरेत अनेक अर्थ आहेत. वैष्णव या संज्ञेला पात्र ठरण्याजोगे अंश अंगी बाणवावेत, त्यातील काही अंश माझ्यात असावेत अशा अर्थाने मी वैष्णव पुरस्काराचा स्वीकार करत आहे. आषाढी एकादशीच्या पुण्यदिनी मिळणारा हा पुरस्कार आनंदाचा आणि भाग्याचा आहे”, असे भावपूर्ण मनोगत पं. रघुनाथ खंडाळकर यांनी व्यक्त केले.
ह. भ .प विश्वनाथ महाराज इंगळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जे. व्ही. इंगळे व त्यांच्या पत्नी मेघा इंगळे यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा ‘वैष्णव पुरस्कार’ अभिनव गंधर्व म्हणून ओळख असलेले गायक पं. रघुनाथ खंडाळकर यांना कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नामाचा गजर’ या विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
२१ हजार रुपये रोख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. एरंडवणे येथील डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हा पुरस्कार पं. खंडाळकर यांना जे. व्ही. इंगळे आणि मेघा इंगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र व प्रसिद्ध गायक पं. श्रीनिवास जोशी, पं. सुधाकर चव्हाण तसेच कीर्ती इंगळे, अभिषेक इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. याआधी पं. शौनक अभिषेकी, आनंद भाटे, विदुषी देवकी पंडित, श्रीनिवास जोशी, पं. हेमंत पेंडसे, प्रसिद्ध कथक नर्तक गुरु डॉ नंदकिशोर कपोते आणि गायक, संगीतकार डॉ. भरत बलवल्ली यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
मनोगत व्यक्त करताना पं. खंडाळकर म्हणाले, “या पुरस्काराचे नाव अन्वर्थक आहे. वैष्णव कोणाला म्हणायचे, हे परंपरेने सांगितले आहे. ‘सर्वं खलु इदं ब्रह्म’, हे वेदवाक्य ज्याला ज्ञात आहे, जो विष्णूचा भक्त आहे, जो भगवंत नामात रमला आहे, जो वैयक्तिक मानापमानाची चिंता करत नाही, तो वैष्णव असे म्हणतात. वैष्णव या उपाधीला साजेसे काही अंश माझ्यात असावेत आणि वैष्णव या संज्ञेला पात्र ठरण्याजोगे अंश मी अंगी बाणवावेत, अशा हेतूने हा वैष्णव पुरस्कार मला देण्यात आला असावा, असे वाटते. आषाढी एकादशीच्या पुण्यदिनी वैष्णव पुरस्कार मिळणे, ही भाग्याची गोष्ट वाटते. तसेच ह. भ.प. विश्वनाथ महाराज इंगळे यांचे नाव पुरस्काराशी जोडलेले असणे, हेही भाग्याचे आहे.”
हा पुरस्कार मी आई वडील, तसेच माझे संगीतगुरू पं. रामचंद्र यादव, पं. मधुसूदन कुलकर्णी आणि पं. जसराजजी यांना समर्पित करतो. कलाश्री संस्थेचे पं. सुधाकर चव्हाण यांनी परिश्रमपूर्वक उभारलेल्या संस्थेशी मी जोडलेला आहे, याचा मला आनंद आहे. कलाश्री संस्थेचा या आयोजनात मोठा सहभाग आहे. पुरस्कारासोबत कलेच्या सादरीकरणाचा योग आनंदाचा आहे, असेही पं. खंडाळकर यांनी नमूद केले.
जे. व्ही. इंगळे म्हणाले, “आमचे वडील ह. भ. प विश्वनाथ महाराज इंगळे यांनी ४० वर्षे पंढरीची वारी केली. त्यांचे पुण्यस्मरण या पुरस्काराच्या निमित्ताने होते. कलाश्री संस्थेशी इंगळे कुटुंबाचा ऋणानुबंध आहे. वडिलांच्या वारीच्या स्मृतींचा जागर म्हणून आम्ही आषाढी एकादशीच्या दिवशीच या कार्यक्रमाचे आयोजन करतो. सर्वसामान्यांना संतरचनांचा आस्वाद सुगमतेने घेता यावा, म्हणून शास्त्रीय संगीताऐवजी संतरचनांचा कार्यक्रम सादर करतो. नि:स्वार्थपणे संगीतसेवा करणाऱ्या कलाकाराला वैष्णव पुरस्कार देऊन यानिमित्ताने सन्मानित करतो”.
More Stories
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन
Pune: धनकवडी, औंध क्षेत्रात जोरदार अतिक्रमण कारवाई
Pune: संशोधक विद्यार्थ्यांची ही अवस्था तर बाकीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच काय?