पिंपरी, १४ मे २०२५: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (१३ मे २०२५) जाहीर झाला आहे. या परीक्षेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
महानगरपालिकेतील एकूण २,५९७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाव नोंदवले होते. त्यामध्ये मराठी माध्यमातील २,१५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी १,९६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उर्दू माध्यमात एकूण ४४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील ४३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
महानगरपालिकेच्या शाळातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ९४.२० टक्के एवढे आहे. हे यश म्हणजे संपूर्ण महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे.
दहावीच्या परीक्षेत महापालिकेच्या शाळांनी यंदा भरीव कामगिरी केली आहे. हा निकाल आमच्या महापालिकेतील शिक्षकांच्या समर्पित प्रयत्नांचे प्रतीक आहे. उर्दू माध्यमातून ९७.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होणे, ही आनंदाची बाब आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवलेल्या महापालिकेच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव महानगरपालिकेच्या वतीने आर्थिक प्रोत्साहन देऊन करण्यात येणार आहे.
यामध्ये ८० ते ८४.९९ टक्के गुण प्राप्त केलेल्या ९५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५,००० हजार रुपये, ८५ ते ८९.९९ टक्के गुण प्राप्त ६२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०,००० हजार रुपये तर ९० ते १०० टक्के गुण मिळवणाऱ्या १८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या ७ दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष गौरव म्हणून प्रत्येकी ५०,००० रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
९० टक्क्यांच्या पुढे गुण मिळवणारे विद्यार्थी
स्वप्नाली झिंजे, गायत्री विजणमवार, सुरवसे संघर्ष, देवेंद्र झोपळ, पाईकराव चंदू, मंदल मानस, चतुर्वेदी कमलेश, कांबळे शुभम, शिंदे शिवकन्या, कांबळे यशराज, शेख बुशरा आरुफ, काजले अमृता, चौरशिया ललन, मुदमवाढ अष्टविनायक, कांबळे प्रतिक्षा, महतो राजेंद्र, पुलावळे सिद्धी आणि अन्सारी रीयासत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष दिले जाते. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल हा फक्त यशाचं प्रमाणपत्र नसून, विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं फळ आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी या परीक्षेत जिद्दीने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेसोबतच समावेशकतेवर भर देणे, ही आमची वचनबद्धता आहे. – प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यंदाच्या निकालाने आमच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून पुढील शैक्षणिक वर्षातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे. – विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
More Stories
Pune: चाकण भागातील सव्वादोनशे अतिक्रमणावर हातोडा
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १४१ शाळांमध्ये आफ्टर-स्कूल मॉडेलची सुरुवात
PCMC: ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन मालमत्ता कर भरा आणि मिळवा ४ टक्के सवलत!