June 22, 2025

पुणे: चाकणमध्ये कामावर निघालेल्या महिलेवर बलात्कार, आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक

चाकण, १४ मे २०२४: चाकण औद्योगिक क्षेत्रात कामावर निघालेल्या महिलेला अंधाराचा फायदा घेत फरफटत निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अज्ञात इसमाने लैंगिक अत्याचार केले. ही संतापजनक घटना मंगळवारी (१३ मे) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मेदनकरवाडी, चाकण येथे घडली. तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपीला २४ तासांच्या आत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला नाईट शिफ्टसाठी कंपनीत जात होती. या दरम्यान अज्ञात इसमाने तिचा पाठलाग करत खंडोबा मंदिराजवळ तिचा रस्ता अडवला. त्यानंतर जबरदस्तीने ओढत निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. अत्याचारानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर महिलेला तातडीने वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त शिवाजी पवार, गुन्हे शाखेची पथके आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक आणि फॉरेन्सिक (आयकार) पथकाची मदत घेण्यात आली आहे.

पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले व स्थानिकांमध्ये चौकशी करण्यात आली. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले होते. सदर घटनेबाबत चाकण पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान आरोपी प्रकाश तुकाराम भांगरे (सध्या रा. मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. अकोले, जि. अहमदनगर) याचे नाव निष्पन्न झाले. त्यास ताब्यात घेण्यात आले असून, विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीस अटक ची प्रक्रिया पूर्ण करून अधिक तपास सुरू आहे.