May 15, 2025

पीएमपीएमएलचा तोटा सातपटीने वाढला, महापालिका लेखापरिक्षण अहवालात ताशेरे

पुणे, १२ फेब्रुवारी २०२५: पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) तोटा दरवर्षी वाढतच असून मागील दहा वर्षात हा तोटा सातपटीने वाढून ते ७६६ कोटी ८४ लाखांवर पोहोचला आहे. हा तोटा कमी करण्यासाठी लेखापालांनी काही पर्याय सुचविले आहेत. मात्र, पीएमपीएमएलच्या बाबतीत आतापर्यंतचा राजकिय दृष्टीकोन पाहाता त्याची अंमलबजावणी होणे अशक्य वाटतो.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीसह पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये पीएमपीएमएलकडून बस सेवा पुरविली जाते. या सेवेसाठी पुणे महापालिका ६० टक्के तर पिंपरी चिंचवड महापालिका ४० टक्के खर्च उचलते. बसची सेवा पीएमआरडीएच्या हद्दीतही दिली जाते. त्यामुळे खर्चाचा भार पीएमआरडीएनेही उचलावा, असा निर्णय झाला आहे.

बस सेवेतून पीएमपीएमएलला उत्पन्न मिळत असले, तरी खर्चाचे प्रमाण अधिक आहे. पीएमपीएमएलमध्ये अकरा हजार कर्मचारी कार्यरत असून, त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. इंधनाचे दरही वाढले आहेत. पीएमपीएमएलच्या ताफ्यात खासगी ठेकेदारांच्या बसगाड्यांसाठी भाडे द्यावे लागते. ग्रामीण भागातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे पीएमपीएमएल’चा तोटा दरवर्षी वाढतच आहे. पीएमपीएमएलला २०१४- १५ मध्ये ९९ कोटी ४४ लाख रुपये तोटा झाला होता. तो आता सात पटीने वाढून ७६६ कोटी ८४ लाखांवर पोहोचला आहे.
————–

तूटीची कारणे…
* तिकीट विक्री व पास उत्पन्नामध्ये घट.
* तिकिट अथवा पास दरवाढ नाही.

* तपासणी पथके सक्षम नाहीत.
* प्रति कि.मी. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक .

* पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेकडून मिळणार्या पासेसच्या उत्पन्नात घट
* उत्पन्न, खर्च, उत्पादीत धाव, स्थायी खर्चामध्ये कोणतीही बचत नाही.

* सेवकांवरील वेतन खर्च वाढ.
* बसेसचे २१ लाख ६० डेड (अनुउत्पादक) कि.मी. रनिंगमुळे २४ कोटी ६८ लाख रुपये नाहक खर्च.

* आयुर्मान वाढलेल्या बसेस बंद पडत असल्याने रस्त्यावरील बसेसची संख्या कमी.

सुचविलेल्या उपाययोजना…

* तपासणी पथकांचे सक्षमीकरण करणे.

* तिकीट व पास दराचा अभ्यास होणे गरजेचे.
* बसेसचा डेड किलोमीटर खर्च कमी करणे.

* वारंवार बंद पडणार्या बसेसबद्दल योग्य तो निर्णय घेणे.
* जास्तीत जास्त बसेस मार्गावर उपलब्ध करणे.

* पीएमपीच्या मालमत्तांचा उत्पन्नासाठी व्यावसायीक वापर करणे.
* मार्गांची फेररचना करून तुटीतील मार्ग बंद करणे.

* खर्चात काटकसर करणे.