October 30, 2025

पीएमआरडीए महानगर आयुक्तांचे मॉन्सूनपूर्व तयारीच्या कामांना गती देण्याचे न‍िर्देश

पुणे, ७ मे २०२५: मॉन्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यंत्रणेची महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली आकुर्डी कार्यालयात मंगळवारी (दि.६) आढावा बैठक झाली. यात महानगर आयुक्त यांनी संभाव्य आपतकाल‍िन परिस्थितीचा विचार करून पीएमआरडीएची यंत्रणा अलर्ट ठेवत नालेसफाईची मोहीम तातडीने हाती घेण्याचे निर्देश विभागप्रमुखांच्या बैठकीत दिले.

मॉन्सूनपूर्व रस्त्यांची कामे, दुरुस्ती तातडीने करत मोकळ्या जागांवर टाकलेल्या राडारोडा न उचलणाऱ्या संबंध‍ित जागा मालकांवर कारवाई करण्याचे न‍िर्देश महानगर आयुक्त यांनी बैठकीत द‍िले. पीएमआरडीए हद्दीतील काही भागात सर्रासपणे राडारोडा टाकण्यात आले आहे, अशा जागा मालकांनी ते तातडीने उचलून घ्यावे, अन्यथा संबंध‍ितांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पुणे महानगर आपत्ती प्रत‍िसाद पथकला (पीडीआरएफ) पूर, दरड कोसळणे यासह इतर संभाव्य आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवत सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे न‍िर्देश बैठकीत देण्यात आले.

यावेळी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी, पीएमआरडीए हद्दीतील अर्बन ग्रोथ सेंटर भागातील नालेसफाई तातडीने करत नाल्यांच्या प्रवाहातील अडथळे दूर करण्याच्या कामाचे आदेश अधिकाऱ्यांना द‍िले.

अतिरिक्त महानगर आयुक्त दिपक सिंगला, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, विकास परवानगी विभागाचे संचालक सुनील मरळे, मुख्य अभियंता र‍िनाज पठाण, मुख्य अग्न‍िशमन अध‍िकारी देवेंद्र पोटफोडे, सह आयुक्त ह‍िम्मत खराडे, सह आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील, सह महान‍ियोजनकार श्वेता पाटील यांच्यासह आदी अध‍िकारी कर्मचारी यावेळी उपस्थ‍ित होते.