June 22, 2025

पीएमआरडीएची अनाधिकृत होर्डिंगवर धडक कारवाई, कारवाई टाळण्यासाठी संबंधितांनी भरली ४८ लाखाची रक्कम

पुणे, २५ एप्रिल २०२५ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर सोमवारपासून (दि.२१) कारवाई सुरू झाली असून यात हवेली आणि मुळशी तालुक्यात तीन ठिकाणी एकाच वेळी अनधिकृत होर्डिंगवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे संबंधितांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी प्राधिकरणाकडे ४८ लाखांची रक्कम जमा केली आहे.

ही कारवाई हवेली तालुक्यातील वडकी, मुळशी तालुक्यातील हिंजवडी येथून सुरू करण्यात आली. या कारवाईमुळे होर्डींगधारक व ॲडव्हरटायझिंग कंपनी यांनी धसका घेतला असून प्राधिकरणाच्या विकास परवानगीकडे अंतिम चलणे भरण्यास सुरुवात झाली आहे. या कारवाईमुळे २२ एप्रिलपर्यंत एकूण १० होर्डींगधारकांनी अंतिम चलणाची रक्कम ४८ लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे.

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दिपक सिंगला, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, सह आयुक्त डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. कारवाईवेळी तहसीलदार रविंद्र रांजणे, तहसीलदार सचिन मस्के, अभियंता विष्णू आव्हाड, दिप्ती घूसे, प्रशांत चौगले, ऋतुराज सोनवणे, गणेश जाधव, तेजस मदने यांच्यासह स्थानिक बंदोबस्त तैनात होता.

प्राधिकरण क्षेत्रात अवकाळी पाऊस, वादळी वारे आदींमुळे होर्डीगपासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा अनेक घटना देखील यापूर्वी झाल्या आहेत. दरम्यान याची दखल घेत यापुढे नियमित अनधिकृत होर्डींगवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वर्दळीच्या व रहदारीच्या ठिकाणाचे धोकादायक, मर्यादितपेक्षा उंचीचे, दुबार संरचना होर्डिंग काढण्यात येत आहेत.

होर्डिंगधारकांनी होर्डिंगला परवानगी घेण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा एकतर्फी निष्कासन कारवाई करण्यात येईल. दरम्यान प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय कोणतेही नवीन होर्डिंग उभारले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन प्राधिकरणाच्या सहआयुक्त (प्र) डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांनी केले आहे.