January 20, 2026

पुण्यात बॅडमिंटन स्पर्धेत भविष्यवेधी प्रयोग

पुणे, दि. २१ मे, २०२४ : वलयांकित आणि व्यावसायिक खेळ म्हणून आज जागतिक पातळीवर सुप्रसिद्ध असलेल्या बॅडमिंटन या खेळाची सुरुवात जशी पुण्यात झाली तसेच आता याच पुण्यात बॅडमिंटन या खेळात अनेक नाविन्यपूर्ण आकर्षक बदल करण्याचा प्रयत्न होत आहे. हा प्रयत्न विविध वयोगटातील बॅडमिंटन पटूंच्या पसंतीस उतरत असून याचे स्पर्धात्मक आयोजन स्विकारायला देखील ते तयार असल्याचे पहायला मिळाले आहे.

बॅडमिंटन खेळाच्या भविष्यातील विकासासाठीचा एक स्पर्धात्मक बदल म्हणून पुण्यातील फिटनेस तज्ज्ञ मिहीर तेरणीकर आणि प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आर्य भिवपाठकी यांच्या पुढाकाराने बॅडमिंटन खेळामध्ये त्रिपल्स (३ वि ३) आणि ५ वि ५ अशा दोन नाविन्यपूर्ण प्रकारातील स्पर्धांचे आयोजन नुकतेच शिवाजीनगर येथील मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले होते. पुण्यात उगम झालेल्या बॅडमिंटन या खेळात विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण स्पर्धात्मक बदल आणून तो खेळ आधिक आकर्षक व वैश्विक पातळीवर प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येत असल्याचे स्पर्धेच्या आयोजकांनी नमूद केले.

याविषयी अधिक माहिती देताना स्पर्धेचे आयोजक मिहीर तेरणीकर म्हणाले, “रॅकेट इव्हेंट्समध्ये प्रामुख्याने एकेरी आणि दुहेरी असे दोनच प्रकार आपल्याला पहायला मिळतात. यापैकी खेळाडू कोणत्याही प्रकारात सामील झाला तरी तो खेळाचा आनंद घेत प्रत्येक स्पर्धेत स्पर्धात्मक खेळण्यासाठी व विजयी होण्यासाठी उतरत असताना दिसतो. बॅडमिंटन खेळाचा आनंद आणखी द्विगुणीत व्हावा, खेळाचे व खेळाडूंचे स्पर्धात्मक आकर्षण वाढावे व यासोबतच नियमांची मर्यादा काटेकोरपणे पाळली जाऊन खेळाडूंची क्षमता वाढावी, प्रेक्षकांनाही हा खेळ पाहताना नवा आकर्षक अनुभव मिळावा या दृष्टीने बॅडमिंटन या खेळात काही प्रकारचे बदल करावेत असा विचार आम्ही केला आणि त्यानुसार मॉडर्न त्रिपल्स (२ पुरुष – १ महिला), क्लासिक त्रिपल्स (३ पुरुष) आणि ५ विरुद्ध ५ (किमान १ महिला खेळाडू) हे तीन प्रकार शोधण्यात आले व त्याचे स्पर्धेत रूपांतर करून ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली.”

बॅडमिंटन कोर्टावर खेळाडूंची संख्या वाढल्याने खेळाचे चित्र आणि गतीशीलता बदलल्याचे व ती अधिक प्रमाणात आकर्षक होत असल्याचे आमच्या लक्षात आले, मुळात खेळाडूंची संख्या वाढल्याने खेळाच्या रॅलीज अधिक प्रमाणात गतीमान व मोठ्या होऊन सामन्याचा कालावधी दीर्घ होऊन रॅलीज अधिक आकर्षक रितीने रंगल्याचा फरक या दरम्यान आम्हाला प्रकर्षाने जाणवला. बॅडमिंटन खेळाचा एक वेगळाच आनंद घेत खेळण्याची संधी मिळाल्याने खेळाडूंचे कौशल्ये आणि धोरणे यांमध्ये नाविन्यता पहायला मिळाली. बॅडमिंटन खेळाचे दीर्घ सामने होत असताना रोमांचकारी लढती आणि वैविध्यपूर्ण रॅलीज देखील वाढल्या आणि गतिमान रॅलीजमुळे व आकर्षक शॉटस् मुळे जाणकार प्रेक्षकही उत्साही व आनंदी झाल्याचे अनुभवायला मिळाल्याचे तेरणीकर यांनी आवर्जून सांगितले.

या स्पर्धांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (बीडब्लुएफ)च्या कोअर कमिटी सदस्यांशी या बाबतीत चर्चा करून आणि त्यांचा तांत्रिक सल्ला घेऊन या खेळांचे नियम बनवण्यात आले आहेत. नजीकच्या भविष्यात आणखी उच्चस्तरावर या स्पर्धा भरविताना हे नियम ग्राह्य धरणे शक्य होऊ शकेल, असा विश्वास आयोजक मिहीर तेरणीकर यांनी व्यक्त केला.

बॅडमिंटन खेळात विविध गटातील खेळाडूंची सर्वसमावेशकता हे या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे खरे सौंदर्य असून त्यामध्ये नाविन्यपूर्ण बदल व्हावेत व खेळाडूंमध्ये या बदलाचे आकर्षण वाढावे या उद्देशाने तेरणीकर स्पोर्ट्स अँड फिटनेस फाऊंडेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे उद्दिष्ट पुण्यातील सर्व बॅडमिंटनप्रेमींना एकत्र आणून या खेळाचा आनंद नव्या, गतिमान, आकर्षक, रोमांचक पद्धतीने देण्यात यावा व त्यासाठी एक स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा होता अशी माहिती महाराष्ट्राचे प्रसिद्ध राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू आर्य भिवपाठकी यांनी दिली.

श्रेयस साने आणि अर्थव खिस्ती या खेळाडूंनी या स्पर्धेतील तीनही प्रकारात सांघिक पदके प्राप्त करून सामानावीर होण्याचा सन्मान प्राप्त केला.

स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे –
मॉडर्न त्रिपल्स प्रकारातील विजेते – श्रेयस साने, अर्थव खिस्ती व सानिया तापकीर.
क्लासिक त्रिपल्स प्रकारातील विजेते – श्रेयस साने, अर्थव खिस्ती, अनिकेत बांडगर
५ विरुद्ध ५ प्रकारातील विजेते – श्रेयस साने, अर्थव खिस्ती, अनिकेत बांडगर, अभिषेक कुलकर्णी, सानिया तापकीर