September 14, 2024

पुणे: तीन रात्रीत बुजविले १,२२४ खड्डे

पुणे, ६ ऑगस्ट २०२४: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिल्यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास वेग आला आहे. पुणे महापालिकेने ३ ते ५ ऑगस्ट या तीन रात्रीत १ हजार २२४ खड्डे बुजवून १५३ ठिकाणी पॅचवर्कचे काम केले आहे. या कामासाठी २५६ मेट्रिक टन डांबरमिश्रित माल वापरला आहे.

पुणे शहरात ड्रेनेज आणि जलवाहिनी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाई केली होती. त्यावर पॅचवर्कचे काम केले होते; पण हे पॅचवर्क रस्त्याशी एकरूप झाले नव्हते. मुसळधार पावसामुळे रस्ते खोदाईनंतर वरवरच्या मलमपट्टीने रस्ते उघडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वच रस्त्यांवर पाणी साचून खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर खडी पसरली आहे.

पुणे शहरांमधील विविध रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची मोहीम शनिवारी रात्रीपासून तीव्र करण्यात आली आहे. पथ विभागातील सर्व अभियंते शनिवारी, रविवारी आणि सोमवारी रात्रभर खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. ३ ते ५ ऑगस्ट या कालावधीत १ हजार २२४ खड्डे बुजविण्यात आले आहेत. त्यासाठी २५६ मेट्रिक टन डांबरमिश्रित माल, तर ३६३ क्युबिक मीटर काँक्रीटचा वापर केला आहे, असे पुणे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.