May 4, 2024

पुणे: कारागृह विभागातील १७ अधिकार्‍यासह कर्मचार्‍यांचा सन्मान, स्वातंत्र्यदिनी १८६ बंदीवानांची सुटका

पुणे, दि. १६/०८/२०२३: स्वातंत्र्यदिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती पदक विजेत्या महाराष्ट्र कारागृह विभागातील १७ अधिकारी आणि कर्मचार्‍यांना त्यांनी सन्मानित केले. कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे उपस्थित होत्या.

स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र कारागृह विभागातील १७ अधिकारी आणि कर्मचार्‍यांना पदके जाहीर झाली आहेत. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने कारागृह विभागाला पदके जाहीर झाली आहेत. त्यामध्ये ५ अधिकार्‍यांसह १२ अधिकारी व कर्मचार्‍यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक घोषित झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये सुनील निवृत्ती ढमाळ (अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह) तात्यासाहेब सदाशिव निंबाळकर (तुरुंगाधिकारी), प्रकाश बाबुराव उकरंडे (तुरुंगाधिकारी,) आनंद शंकर हिरवे (सुभेदार) , गणेश पांडुरंग घोडके (हवालदार), अनिल हणमंत खामकर (अधीक्षक येरवडा खुले कारागृह), वामन तुकाराम निमजे (तुरुंगाधिकारी) विजय ज्ञानेश्वर कांबळे (तुरुंगाधिकारी), तानाजी कृष्णा धोत्रे (तुरुंगाधिकारी), किशोरीलाल सुकराम रहांगडाले (सुभेदार), विजय लाडकू पाटील (सुभेदार), प्रकाश महादेव सातपुते (सुभेदार), चंद्रकांत नारायण बोसोडे (सुभेदार), बाबासाहेब हनुमंत चोरगे (हवालदार), दत्तात्रय किसन भोसले (हवालदार), अशोक कुंडलिक आडाळे (शिपाई) सुधाकर रामकृष्ण माळवे (शिपाई) यांचा समावेश आहे.

आतापर्यंत ५८१ वैâद्यांना मिळाला शिक्षेतून सुटकेचा लाभ

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ‘ समारोहांतर्गत विशिष्ट प्रवर्गाच्या बंद्यांना विशेष माफी देण्यात आली आहे. तिसर्‍या टप्प्यानुसार १८६ बंद्यांना कारागृहातून मुक्त केले. बंद्यांमध्ये कारागृहातील शिस्त व आचरण निश्चित करणे, प्रोत्साहन स्वरूपात लवकर सुटका करणे हाच हेतू आहे. यामुळे बंद्यांना गुन्हेगारी सोडून जबाबदार नागरिक बनण्याकरीता प्रोत्साहन मिळणार आहे. विशेष माफी अंतर्गत आतापर्यंत ५८१ बंदी मुक्त करण्यात आले आहेत. उपक्रमांतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृहातील तिसर्‍या टप्प्यातील विशिष्ट प्रवर्गातील ७ शिक्षा बंद्यांना विशेष माफी देऊन कारागृहातून सुटका केली आहे.