April 28, 2024

पुणे: हिंगणे भागात माळीण, इर्शाळवाडी सारखी दुर्घटना व्हायला नको, प्रशासनास पत्र…

पुणे, २१/०७/२०२३: पुण्यातील हिंगणे भागातील तळजाई टेकडीचा मागचा भाग अनधिकृतपणे फोडून भूमाफियांकडून या परिसराचे सपाटीकरण जोरात सुरु आहे. यामध्ये हा भाग धोकादायक झालेला असून येथे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुणे महानगरपालिका व वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. माळीण, इर्शाळवाडीसारखी दुर्घटना याठिकाणी घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली असून यासंदर्भात शिवसेनेचे प्रसिद्धीप्रमुख व पर्यावरणप्रेमी अनंत घरत यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आले आहे.

अनंत घरत म्हणाले की, पुण्यातील टेकड्यांवर बीडीपी आरक्षण असताना अनाधिकृतपणे प्लॉटिंग करून सामान्य जनतेची व प्रशासनाची मोठी फसवणूक भूमाफिया करत आहेत. हिंगणे खुर्दमधील अथर्व नगर जवळील सर्वे नंबर ५ मध्ये विकास आराखड्यात असलेला नैसर्गिक ४० फुटी नाला भूमाफियांनी बुजविला आहे. त्यावर प्रशासनाकडून कोणतेही कारवाई केली जात नाही. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार टेकड्यांवर अनधिकृत बांधकाम व प्लॉटिंगची माहिती महापालिकेला देण्यासाठी बीट ऑफिसर नेमले आहेत, परंतु ते त्यांची जबाबदारी निभावताना दिसत नाहीत. अशा टेकड्या फोडून बेकायदेशीर प्लॉटिंग केली जात आहे. सदर प्लॉटिंग करत असताना जागा मालक व विकसक यांनी तळजाई टेकडीच्या वन विभागाच्या भिंतीपासून फक्त एक ते दीड फूट जागा सोडून टेकडी फोडून पूर्णपणे सपाटिकरण केले जात आहे, यामुळे जास्त पाऊस झाला तर फॉरेस्टची भिंत कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी माळीण गाव जसे उत्खननामुळे पूर्ण गाव दरड कोसळल्यावर दरड खाली झाकून गेले होते तशी परिस्थिती हिंगण्यामध्ये होईल. तसेच काही वर्षांपूर्वी कात्रज घाटा पलीकडील शिंदेवाडी मध्ये अशीच प्लॉटिंग केली असता तिथे मोठा अपघात झाला होता. त्या अपघातात निष्पापांचे बळी गेले होते. आजची रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटना ह्याप्रकारे पुण्यामध्ये हिंगणे खुर्द येथे होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे घरत म्हणाले.