September 23, 2025

पुणे: विधी महाविद्यालय रस्त्यावर घरफोडी, सदनिकेतून साडेसहा लाखांचा ऐवज चोरीस

पुणे, २२/०९/२०२३: विधी महाविद्यालय रस्त्यावर एका सोसायटीतील सदनिकेचे कुलुप तोडून चाेरट्यांनी २७ तोळे सोन्याचे दागिने, रोकड असा सहा लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याच घटना घडली.

याबाबत एका व्यावसायिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार विधी महाविद्यालय रस्त्यावरील दीक्षित को-ऑप सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी व्यावसायिकाच्या सदनिकेचे कुलुप तोडून प्रवेश केला.

शयनगृहातील कपाट उचकटून २७ तोळे सोन्याचे दागिने, अडीच लाख रुपये, चांदीच्या वस्तू असा सहा लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. व्यावसायिकाची सदनिका बंद होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस निरीक्षक साळुंखे तपास करत आहेत.