May 11, 2024

दुबई मध्ये स्थापन झाले बालगोपाळांचे भारता बाहेरील पहिले ढोल ताशा पथक

पुणे, २३/०९/२०२३: त्रिविक्रम ढोल ताशा पथक दुबई हे संपूर्ण आखाती देशात स्थापन झालेले पहिले व एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक आहे. या पथकाची स्थापना सागर पाटील यांनी सन 2017 मध्ये दुबईत केली. महाराष्ट्राचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढोल ताशा संस्कृतीचा प्रचार या पथकाने आजवर केला व या पथकाला महाराष्ट्र शासनाने खास मराठी भाषा सन्मान देऊन गौरविले होते.

नुकतेच या पथकाचे 150 प्रयोग पूर्ण झाले असून, ढोल ताशा संस्कृतीचा वारसा नवीन पिढीला सोपवण्यासाठी या पथकाने खास लहान मुलां करिता नविन पथक सुरू केले आहे. त्रिविक्रम बालमित्र ढोल ताशा पथक दुबई असे या पथकाचे नाव असून यामध्ये 6 ते 14 वर्षाच्या मुला- मुलींचा सहभाग आहे. “परदेशात वाढणाऱ्या या मुलांना आपल्या महाराष्ट्राच्या कला व संस्कृतीची जाणीव असावी व त्याची ओढ लागावी म्हणून या पथकाची स्थापना मी केली”, असे पथकाचे संस्थापक सागर पाटील म्हणतात.

या लहान मुलांना ढोल ताशा लेझीम ध्वज झांज या वाद्यांची ओळख करून त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले आहे.

19 सप्टेंबर रोजी अबुधाबी मध्ये झालेल्या गणेश उत्सवात ह्या बालमित्र पथकाने सुमारे 6000 गणेश भक्तांच्या समोर सादरीकरण करून प्रेक्षकांचे मन जिंकले. पथकात सध्या 12 कलाकार आहेत व नवीन सभासद नोंदणीला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पथकाचे नेतृत्व सागर पाटील करत आहेत. पथकामध्ये पुषन पाटील, काव्या सांगले, हेतवी जोशी, ओम व ईश्वरी इरवाडकर, अनय व विनय पाटील, अन्विता सावंत, आदि पाटील, विनंती व साक्षी हसबे, भाग्या गावडे, आरुष कर्वे, पलाश कुलकर्णी, अशी या बाल मित्रांची नावे आहेत.

येणाऱ्या काळात बालमित्रांचेे हे पथक दुबईतील अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये ढोल ताशाचे वादन करून मराठमोळी संस्कृती परदेशात जपण्याच्या कार्यात हातभार लावताना दिसतील.