पुणे, ३ मे २०२५ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या ड्रेनेज विभागाकडून सध्या मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. मात्र, ड्रेनेज लाईन आणि चेंबर साफ केल्यानंतर निघणारा गाळ आणि राडारोडा तसाच रस्त्यावर, चेंबरच्या कडेला टाकून दिला जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
परिणामी, वाहतूक आणि पादचाऱ्यांच्या हलचालींमुळे ही घाण पुन्हा ड्रेनेजमध्ये परत जात आहे.सदाशिव पेठ, नवी पेठ, लोकमान्य नगर आणि सिंहगड रोड परिसरात या समस्येची तीव्रता अधिक असून, हा प्रकार म्हणजे “पालथ्या घड्यावर पाणी” ओतल्यासारखा असल्याची टीका नागरिक करत आहेत.
अधिक चिंतेची बाब म्हणजे, गाळ ओला असल्याचे कारण देत ठेकेदार त्याचे उचल काम पुढे ढकलत आहेत. महापालिकेकडूनच हे कारण अधिकृतपणे मान्य करण्यात आले असून, गाळ सुकल्यानंतरच तो उचलायचा असा अजब नियम लागू असल्याचे सांगितले जात आहे.महापालिकेच्या नियोजनानुसार, ३१ मे पूर्वी सर्व पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
मात्र, सफाई काम सुरू असलेल्या भागांमध्ये गाळ त्वरित उचलण्यासाठी आवश्यक यंत्रणा आणि मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने कामात अडथळे निर्माण होत आहेत. अनेक ठिकाणी सफाई कामगार चेंबरशेजारीच गाळ टाकून निघून जातात, तर त्याच्या उचल व्यवस्था नसल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यामुळेच गाळ पुन्हा ड्रेनेजमध्येच जात असल्याने संपूर्ण मोहिमेचा परिणामच फसतो आहे.
वास्तविक पाहता, उन्हामुळे गाळ लवकर सुकतो आणि त्यानंतर वाऱ्याने किंवा वाहनांच्या गतीमुळे तो रस्त्यावर पसरतो. परिणामी सकाळी झाडू मारणारे कर्मचारी तोच गाळ पुन्हा चेंबरमध्ये झाडून टाकत असल्याचेही चित्र दिसत आहे.नागरिकांनी या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले असून, गाळ काढल्यानंतर तो त्वरित उचलण्याची आणि ठेकेदारांकडून जबाबदारीची योग्य अंमलबजावणी करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. अन्यथा या मोहिमेचा मूळ उद्देशच धुळीस मिळण्याची भीती व्यक्त होत आहे.
More Stories
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन
Pune: धनकवडी, औंध क्षेत्रात जोरदार अतिक्रमण कारवाई
Pune: संशोधक विद्यार्थ्यांची ही अवस्था तर बाकीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच काय?